सुर नदीच्या पात्रातून रेतीचा अवैध उपसा
By admin | Published: March 5, 2017 12:40 AM2017-03-05T00:40:21+5:302017-03-05T00:41:44+5:30
सुरगाव गावाजवळून वाहणाऱ्या सुर नदीवर रेती चोरांनी धुडगूस घातला आहे. गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारे...
संबंधित विभागाचे दुर्लक्ष : मुरूमाची होते चोरटी वाहतूक
सेलू/आकोली : सुरगाव गावाजवळून वाहणाऱ्या सुर नदीवर रेती चोरांनी धुडगूस घातला आहे. गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारे वजन राखून असल्याने संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे. रेती व मुरुम चोरीला आळा घालणे प्रशासनाला अशक्य झाल्याचेच दिसून येते. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
जि.प., पं.स. निवडणुकीचा बिगूल वाजताच अवैध गौण खनिज चोरीला उधाण आले होते. कर्मचारी निवडणूक कार्यात गुंतलेले असल्याने कार्यवाही होऊ शकली नाही, असे ग्रामस्थांना वाटले; पण निवडणूक संपून त्या जबाबदारीतून कर्मचारी मोकळे झाले असताना चोरीच्या घटनांवर आळा घातला जात नसल्याने ग्रामस्थ आश्चर्य करीत आहेत. राजकीय वजन वापरून असलेले वाहतुकदार कसलीही भीती न बाळगता दिवस-रात्र रेतीवर डल्ला मारत लाखोची कमाई करीत असल्याचे दिसते. दिवसभर येळाकेळी, सेलू, झडशी व पवनारकडे रेतीने भरलेले ट्रॅक्टर जाताना नागरिकांना दृष्टीस पडतात; पण कर्तव्यावर असलेल्या संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना ते दिसत नाही, हे आश्चर्यच आहे. रेती व मुरूम चोरीवर गब्बर झालेले वाहतुकदार राजकीय पुढाऱ्याशी असलेली सलगी दाखवून कर्मचाऱ्यांवर दबावतंत्र वापरत असल्याचे कर्मचारी खासगीत कबुल करतात. यामुळे अवैध गौण खनिज चोरीला आळा घालणार तरी कोण, हा प्रश्नच आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)