वृक्षांची अवैध कत्तल पर्यावरणाच्या मूळावर
By admin | Published: April 21, 2017 01:55 AM2017-04-21T01:55:50+5:302017-04-21T01:55:50+5:30
शासनाकडून वृक्ष लागवडीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे; पण वृक्ष संवर्धन, संगोपनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.
लाकूड चोर सक्रिय : वन व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
वर्धा : शासनाकडून वृक्ष लागवडीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे; पण वृक्ष संवर्धन, संगोपनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल होत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. वन व बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने लाकूड चोर कंत्राटदारांचे फावत असल्याचे दिसते.
वृक्षतोडीमुळे पर्यावरणास धोका होण्याची भीती आहे. वैध व अवैधरित्या वृक्ष कापल्यानंतर तेथे नवीन वृक्ष लावण्याची तसदी घेतली जात नाही. मोठ-मोठी वृक्ष कापली गेल्याने वनाचा मोठा भाग ओसाड होत आहे. परिपक्व न झालेली वृक्षेही अवैधरित्या कापली जात आहेत. एवढेच नव्हे तर मौल्यवान सागवान लाकडाचा वापर जलतरणासाठी केला जात आहे. या बाबीवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने तस्कर आणि इतर वापरांसाठी वृक्ष तोडणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसते. विशेषत: वनपरिक्षेत्रात येणारा जंगलव्याप्त भाग तस्करांनी लक्ष्य केल्याचे दिसते. शिवाय अतिक्रमितांनी वृक्ष जाळून भुईसपाट करण्याचा सपाटा लावला आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी याबबात गंभीर नसल्याचे दिसते. सागवान वृक्ष तोडून आवश्यक तसा माल तयार करून विकला जात आहे. मागील काही महिन्यांपासून वाढलेल्या या प्रकारावरून परिसरात सागवान चोरट्यांची टोळी सक्रीय झाली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे. नवीन बांधकामासाठी दारे खिडक्या तयार करण्याकरिता स्वस्तात मिळत असलेले लाकूड खरेदी केले जात आहे. फर्निचर तयार करणाऱ्यांची वनअधिकारी व कर्मचाऱ्यांशी जवळीक असल्याने त्यांचाही व्यवसाय तेजीत आहे. या संपूर्ण प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
उमरी (मेघे) परिसरात विनापरवानगी वृक्षांची कत्तल
शहरालगतच्या उमरी (मेघे) परिसरातील शिव मंदिराच्या मागील परिसरातील रविवारी वृक्षांची कत्तल करण्यात आली. हा प्रकार भर उन्हात केवळ दोन ते तीन तासांत घडला. या वृक्षकटाईकरिता कोणत्याही विभागाची परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य सरकार वृक्ष लागवडीसाठी सातत्याने झटत आहे. यावर्षी राज्यात दोन कोटी वृक्षरोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यानुसार शासनातील सर्व विभागांनी पुढाकार घेत वृक्षरोपांची लागवड केली. एकीकडे वृक्षरोपे लावण्याला प्राधान्य दिले जात असताना काही ठिकाणी वृक्षांची अवैधरित्या कत्तल केली जात आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून वृक्ष लागवडीवरील खर्च व्यर्थ ठरत असल्याचे दिसते.