अवैध प्रवासी वाहतूक ठरतेय जीवघेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2015 02:14 AM2015-06-10T02:14:11+5:302015-06-10T02:14:11+5:30
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील असलेल्या या शहरात सर्रास अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे.
पोलिसांचे दुर्लक्ष : काळी-पिवळी, आॅटोत कोंबतात प्रवासी
कारंजा (घा.) : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील असलेल्या या शहरात सर्रास अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. परिवहन महामंडळाच्या बसेस कमी असल्याने प्रवाश्यांनाही जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याकडे पोलीस यंत्रणेसह सर्वांचे दुर्लक्ष होत असल्याने ही वाहतूक प्रवाश्यांच्या जीवावर बेतताना दिसते. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
नागपूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुका प्रवासाच्या दृष्टीने सोयीस्कर नाही. वर्धा ते कारंजा तसेच अन्य मार्गावरही बसेस कमी असल्याने नागरिकांना अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा आधार घ्यावा लागतो. या वाहनांद्वारे सर्रास प्रवासी वाहतूक केली जात असून प्रवाश्यांना अक्षरश: कोंबले जाते. यामुळे अपघाताचा धोका बळावला आहे. राष्ट्रीय महामार्गावर अपघात नित्याचेच झाले आहेत. यातच प्रवासी कोंबलेली वाहने चालकांना व्यवस्थित चालविणे शक्य होत नसल्याने तीही अपघातग्रस्त होतात.
रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी करून प्रवासी घेणे, रस्त्यात कुठेही ‘ब्रेक’ दाबून वाहने थांबविणे आणि प्रवाश्यांची चढ-उतार करणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. यामुळेच अपघाताची शक्यता बळावली आहे. अवैध प्रवासी वाहतुकीला जिल्ह्यात अधिकृत परवानगी असल्यागत ही वाहतूक होते. यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय व पोलीस यंत्रणेच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)