अवैधरीत्या विनापरवानगी तोडले झाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 09:56 PM2018-07-17T21:56:29+5:302018-07-17T21:57:11+5:30
एका स्वमर्जीतील इसमाच्या घरात झाडाचे वाळलेली पाने वाऱ्याने उडून कचरा होतो या क्षुल्लक कारणासाठी पंचवीस-तीस वर्षापूर्वी लावलेल्या वृक्षांना बुडापासून विनापरवानगी तोडण्याचे काम धानोली(मेघे) गावच्या सरपंचाने केल्याचा प्रकार...
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : एका स्वमर्जीतील इसमाच्या घरात झाडाचे वाळलेली पाने वाऱ्याने उडून कचरा होतो या क्षुल्लक कारणासाठी पंचवीस-तीस वर्षापूर्वी लावलेल्या वृक्षांना बुडापासून विनापरवानगी तोडण्याचे काम धानोली(मेघे) गावच्या सरपंचाने केल्याचा प्रकार घडला असून याबाबत ग्रामस्थांनी तक्रार करताच चौकशी चक्रे फिरु लागली आहे.
जिल्हा परिषद शाळेच्या आवारात वाढलेली झाडे वरुन छाटायची होती. जुनाट वाळलेले झाड पडल्यास मुलांना इजा होईल या भिती पोटी शाळा व्यवस्थापन समितीकडून ते झाड तोडण्याबाबत ठराव घेतला व त्या बाबत वनविभागाला परवानगी मागितली. त्यानंतर ते काम थातुरमातुर करुन शाळेच्या बाहेर व रस्त्यात अडचण नसलेले मोठे झाड विनापरवानगी सरपंच रामू पवार यांनी तोडले याबाबत माजी सरपंच विनोद मेघे व सामाजिक कार्यकर्ते मनीष दुबे यांनी याबाबत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी तहसिलदार महेंद्र सोनवणे यांना विनापरवानगी तोडलेल्या झाडाच्या छायाचित्रासह तक्रार केली. त्यांनी ती माहिती वनविभागाला कळविली. वनविभागाच्या अधिकाºयांनी धानोली(मेघे) येथे जावून प्रत्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापकांची भेट घेतली. तेव्हा परवानगी घेतलेले झाडे न तोडता भलतेच झाडे तोडण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले. यानंतर वनविभागाने सरपंच दोषी असल्याची खात्री पटल्यावर चौकशीची चक्रे फिरविली. सरपंच रामू पवार यांच्यावर वनविभाग कारवाई करुन गुन्हा दाखल करणार हे निश्चित मानल्या जात आहे. याबाबतची तक्रार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ग्रामस्थ करणार आहे.
सरपंचावर गुन्हा दाखल करुन कार्यवाही करावी अन्यथा वनविभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या देण्यात येईल अशी संतप्त प्रतिक्रिया धानोलीचे सर्व माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दुसरेच झाड तोडले
शाळेच्या आवारात वाळलेले झाड आहे ते तोडण्याचा बहाणा करुन त्याच्या नावे परवानगी घेवून दुसरेच झाड तोडले. शाळेच्या आवारातील ते धोकादायक झाड मात्र तसेच ठेवून त्या परवानगीच्या आड शाळेच्या बाहेरील हिरवेगार व डेरेदार झाड तोडून टाकले.
धानोली(मेघे) येथील जि.प. शाळेत जावून सत्यता जाणून घेतली. तेव्हा शाळेने मागितलेल्या परवानगीचा काहीही संबंध नसलेले शाळेबाहेरील मोठे वृक्ष नियमबाह्य तोडण्यात आले आहे. त्यामुळे अधिनस्त अधिकाºयांना वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी पत्र दिले आहे. अहवाल प्राप्त होताच दोषी सरपंचावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-पी.एम.वाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग हिंगणी.
शाळेच्या आवारातील एक झाड वाळले ते पडू शकते तसेच इतर झाडांच्या फांद्या तोडायच्या होत्या. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने परवानगी मागितली. मात्र सरपंचाने शाळे बाहेरचे झाड तोडले त्याच्या आमचा काही संबंध नाही. वनविभागाचे अधिकारी चौकशीला आले असता आम्ही ते झाड नियमबाह्य तोडल्याचे सांगितले.
- छाया सोमनाथे, मुख्याध्यापिका, जि.प. प्राथमिक शाळा, धानोली(मेघे) ता.सेलू.