भाजीबाजाराची उद्घाटनापूर्वीच दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 09:35 PM2019-07-02T21:35:07+5:302019-07-02T21:35:23+5:30

नगरपालिकेने अलीकडेच नव्याने बांधलेल्या भाजी बाजाराचे तारेचे कुंपण उद्घाटनापूर्वीच तुटले. उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेला हा भाजी बाजार पालिकेच्या बेजबाबदारपणाचा एक नमुना ठरत आहे.

Illness before the inauguration of the vegetable market | भाजीबाजाराची उद्घाटनापूर्वीच दुर्दशा

भाजीबाजाराची उद्घाटनापूर्वीच दुर्दशा

Next
ठळक मुद्देतारेचे कुंपण, ओटे तुटले : रहदारीला होतोय अडथळा

हेमंत चंदनखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : नगरपालिकेने अलीकडेच नव्याने बांधलेल्या भाजी बाजाराचे तारेचे कुंपण उद्घाटनापूर्वीच तुटले. उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेला हा भाजी बाजार पालिकेच्या बेजबाबदारपणाचा एक नमुना ठरत आहे.
शहरातील आठवडी बाजारातील मैदानात लाखो रूपये खर्चून तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्य निर्देशानुसार भाजी बाजारासाठी सिमेंटचे मोठ्या आकाराचे सहा ओटे बांधण्यात आले. गुराढोरांचा उच्छाद थांबावा म्हणून तारेचे कुंपणही घालण्यात आले. नियोजनाप्रमाणे तेथे भाजी बाजार स्थानांतरित करावयाचा होता. परंतु ओटे बांधून नऊ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही आणि काम पूर्ण झाल्यानंतरही अद्याप ना भाजी बाजार स्थानांतरित झाला, ना अद्याप ओट्यांचे वाटप करण्यात आले. आवंटनाच्या प्रतीक्षेत हे ओटे असून सध्या पावसातच भाजी विक्रेते वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर बंड्या लावून भाजी विक्री करतात. विक्रेत्यांसाठीच हे ओटे तयार करण्यात आले असताना त्यांना अद्याप आवंटन न केल्याने नगर पालिकेचा हलगर्जीपणा दिसून येतो.
विशेष म्हणजे, तीन-चार वर्षांपूर्वी या भाजी विक्रेत्यांना आठवडी बाजारातील चिखल असलेल्या ठिकाणी भाजी विक्री करावी लागत होती. तेथे कोणत्याही सुविधा नव्हत्या. सर्व भाजी विक्रेते आठवडी बाजाराचे मैदान सोडून लगतच्या मुख्य मार्गावर धडकले आणि तेथेच दुकाने थाटली. हा रहदारीचा व गर्दीचा मार्ग फार पूर्वीपासूनच होता.
या गर्दीच्या मार्गावर दुतर्फा साधारणत सहा-सहा फूट रूंदीची भाजी विक्रीची दुकाने थाटली गेली. दोन्ही बाजंूनी मिळून रस्त्याची १०-१२ फूट जागा या विक्रेत्यांनी व्यापल्यामुळे रहदारीसाठी आता केवळ चिरोटीसारखा भागच शिल्लक राहिला. याच रस्त्यावर पुढे श्रीराम टॉकीजच्या चौकातून डांगरी वॉर्डाकडे येणाऱ्या भागात तर अगदी रस्त्याच्या मध्यभागात हातगाड्या लावून भाजी विक्री करतात. येथून वाट काढताना वाहनचालकांची दमछाक होते. वाहतुकीच्या कोंडीसाठी जबाबदार पालिका, वाहतूक विभाग आणि बंड्या वाल्यांना दोष देत पुटपुटत वाहतूक पुढे सरकत असते. मात्र अद्यापही प्रश्न सुटला नाही. परिस्थिती जैसे थे आहे.
नगरपालिका झोपेचे सोंग घेऊन
जुन्या वस्तीतील आठ वॉर्डांतील नागरिकांनी पाठपुरावा केल्यानंतर नगरपालिकेने दखल घेत आठवडी बाजारातील मैदान मोकळे केले. तेथे भाजी विक्रेत्यांची दुकाने हातगाड्यांसाठी जागा उपलब्ध करून देत तेथे सिमेंटचे ओटे तयार करण्यात आले. तारेचे कुंपणही घालण्यात आले. एवढेच नव्हे, तर वीजखांबही उभारण्यात आले. काम पूर्णत्वास जाऊन आठ-नऊ महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र, ते सिमेंटचे ओटे तसेच आहेत. आवंटन नाही. कुंपणाचे तारही तुटले असून आता टाईल्स व ओटेही फुटू लागले आहेत. मात्र, पालिका प्रशासन झोपेचे सोंग घेऊन आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे डोकेदुखी वाढणार आहे.

Web Title: Illness before the inauguration of the vegetable market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.