मोबाईल मेमोग्राफीतून स्तनांच्या आजाराचे तत्काळ निदान
By admin | Published: July 8, 2015 02:20 AM2015-07-08T02:20:49+5:302015-07-08T02:20:49+5:30
महिलांमध्ये स्तनाचे आजार वाढीवर आहे. हे आजार उपचाराची सीमा ओलांडल्यानंतरच लक्षात येतात. यामुळे तो बरा होईलच याची शाश्वती राहात नाही.
संजय मीना : ग्रामीण महिलांना मिळणार मोफत उपचार
वर्धा : महिलांमध्ये स्तनाचे आजार वाढीवर आहे. हे आजार उपचाराची सीमा ओलांडल्यानंतरच लक्षात येतात. यामुळे तो बरा होईलच याची शाश्वती राहात नाही. या आजारापासून महिलांना वाचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मोबाईल मेमोग्राफी सेवेच्या माध्यमातून घडणार आहे, अशी माहिती जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय आणि रोटरी क्लब आॅफ गांधी सिटीच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक मोबाईल मेमोग्राफी सेवा वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना मिळणार असून यात जिल्हा परिषदेचा महत्त्वाचा सहभाग आहे, असेही मीना म्हणाले.
मोबाईल मेमोग्राफी सेवा जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सर्कलमध्ये किमान एक आठवडा सेवा देणार आहे. त्या अंतर्गत असलेले ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्र, उपकेंद्रस्तरावरील महिलांची तपासणी या माध्यमातून करण्यात येणार आहे. तपासणीच्या वेळीच संबंधित महिलांना स्तनाचा कर्करोग झाला वा नाही याचे निदान होणार आहे. ही सेवा मोफत असणार आहे. यानंतर सदर महिलेवर आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहे. या सेवेपासून ग्रामीण भागातील एकही महिला वंचित राहू नये, यासाठी जि.प. आरोग्य विभागांतर्गत कार्यरत आशा वर्करला विशेष प्रशिक्षण दिले देणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात जनजागृती घडवून आणता येणार असून महिलांना ही सेवा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, अशी माहिती रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे यांनी दिली.
यावेळी जि. प. उपाध्यक्ष विलास कांबळे, आरोग्य सभापती मिलिंद भेेंडे, माजी जि.प. सभापती नितीन देशमुख, रोटरी क्लबचे निर्वाचित प्रांतपाल महेश मोकलकर, आरोग्य विभागाचे डॉ. डवले, डॉ. मीनाक्षी येवला, संजय इंगळे तिगावकर उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
मोबाईल मेमोग्राफी सेवा वर्धेत येत्या लोकसंख्या दिनापासून महिलांसाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. देशातील दुसरी अत्याधुनिक मोबाईल मेमोग्राफी सेवा आहे. यापूर्वी पुणे येथे अशी सेवा रूज झाली होती. मात्र ती अयशस्वी ठरली. वर्धेत ही सेवा रूजू करण्यापूर्वी त्या अपयशामागील बाबींचा अभ्यास करुन त्या दूर करण्यात आल्या आहे. ५० लाख रुपयांची मेमोग्राफी मशीन बेल्झियममधून आणलेली आहे. इतर खर्च ५० लाख रुपये असा एक कोटींचा हा उपक्रम असून याचा लाभ वर्धा जिल्ह्यातील महिलांना मिळणार आहे, अशी माहिती रोटरी क्लबचे निर्वाचित प्रांतपाल महेश मोकलकर यांनी दिली.