आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत
By admin | Published: June 11, 2015 02:00 AM2015-06-11T02:00:49+5:302015-06-11T02:00:49+5:30
नापिकी, कर्जबाजारीपणा व आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकरी आत्महत्येबाबतच्या प्रकरणासंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा.
सहा प्रकरणे मंजूर : चार प्रकरणे वगळलीत
वर्धा : नापिकी, कर्जबाजारीपणा व आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकरी आत्महत्येबाबतच्या प्रकरणासंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा. जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरविलेल्या कुटुंबीयांना त्वरित मदत द्यावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी बुधवारी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी आत्महत्या प्रकरणांबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांच्या अध्यक्षतेत पार पडली. या समितीसमोर एप्रिल व मे महिन्यात झालेल्या १० प्रकरणांवर चर्चा होऊन सहा प्रकरणे पात्र ठरविण्यात आली. तीन प्रकरणांत तालुकास्तरीय समिती व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अहवालानुसार मृतकांच्या नावावर कर्ज नसल्याचे वा अन्य कारणांनी निष्पन्न झाल्याने व एक प्रकरण अन्य गुन्ह्यात मोडत असल्याने वगळण्यात आले.
जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरविलेल्या प्रकरणांमध्ये आर्वी तालुक्यातील टाकरखेडा येथील पुंडलिक विठ्ठल चव्हाण (५५), सोरटा येथील यादव सोनबा गेडाम (७५), शिरपूर (देवळी) येथील विठ्ठल नारायण मोगरकर (५२), गौळ (देवळी) येथील प्रकाश रामदास नामदार (२५), सावली वाघ (हिंगणघाट) येथील रमेश बापूराव सातपुते (५५), केळापूर (वर्धा) येथील यमूना तुळशीराम तुमडाम (७५) यांचा समावेश आहे. बैठकीस जिल्हास्तरीय समिती सदस्य डॉ. नंदकिशोर तोटे, अनिल मेघे, पं.स. सभापती भगवान भरणे, शुभांगी फरकाळे, अग्रवाल आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)