इम्युनिटी बुस्टर किट क्षयरुग्णांसाठी लाभदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 05:00 AM2020-05-16T05:00:00+5:302020-05-16T05:00:12+5:30
या किटमध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रोटिन पावडर, व्हिटामिन गोळया, सॅनिटायझर, मास्क, माहिती दर्शन पुस्तिका आदीचा समावेश आहे. क्षय रुग्णांनी या इम्युनिटी बुस्टर किटचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाने या किट तयार करण्यासाठी अनुदान दिले असुन जिल्हाधिकारी यांनी इम्युनिटी बुस्टर किट जिल्हा क्षय रोग अधिकारी डॉ. सिमा मानकर यांना सुर्पुद केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना आजाराचा धोका हा सर्वाधिक उच्च रक्तदाब, क्षयरोग, मधुमेह, कर्करोग या आजारासह गरोदर माता , वृध्द नागरिक यांना असल्याने त्यांच्या आरोग्याबाबत प्रशासन अधिक दक्ष आहे. त्यामुळे जिल्हयात कोरोनाचा प्रसार कमी ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून क्षय रुग्णांना मोफत इम्युनिटी बुस्टर किटचे मोफत वितरण करण्यात येत आहे.
या किटमध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रोटिन पावडर, व्हिटामिन गोळया, सॅनिटायझर, मास्क, माहिती दर्शन पुस्तिका आदीचा समावेश आहे. क्षय रुग्णांनी या इम्युनिटी बुस्टर किटचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाने या किट तयार करण्यासाठी अनुदान दिले असुन जिल्हाधिकारी यांनी इम्युनिटी बुस्टर किट जिल्हा क्षय रोग अधिकारी डॉ. सिमा मानकर यांना सुर्पुद केल्या. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. बसवराज तेली, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, जिल्हा कार्यक्रम समन्वयक सुमंत ढोबळे, पीपीएम समन्वयक जितेंद्र बाखडे उपस्थित होते.
जिल्हयातील ९६० क्षयरुग्णांना घरपोच इम्युनिटी बुस्टर किटचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून रुग्णांचे सर्वेक्षण या पुर्वीच करण्यात आले होते. कोरोना लॉकडाऊन असल्याने अनेक ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर औषधोपचार देणे गरजेचे आहे. असे जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी हायजिन किटची संकल्पना मांडली.
प्रशासनाच्या मदतीने जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सिमा मानकर यांनी प्रत्यक्षात ही संकल्पना राबविली. जिल्हा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यामार्फत तीन दिवसात या किटचे घरपोच वितरण करण्यात येणार आहे. या किटमध्ये वारंवार धुवुन वापरण्यात येणारे मास्क, प्रोटिन पावडर, मल्टी विटामीन गोळया यांचा समावेश आहे. किट व्यतिरिक्त शासनाकडून पोषण आहार मिळावा यासाठी दरमहा ५०० रुपये क्षयरुग्णांना निश्चय पोषण योजनेचा लाभ क्षय रुग्णांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.