प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करा
By admin | Published: March 17, 2017 02:07 AM2017-03-17T02:07:33+5:302017-03-17T02:07:33+5:30
जि.प. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पंतप्रधान आवास योजनेत घरकूल वाटप केले जाईल,
लाभार्थ्यांची मागणी : गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे
सेलू/आकोली : जि.प. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पंतप्रधान आवास योजनेत घरकूल वाटप केले जाईल, असे सांगून ग्रामपंचायतींनी हजारो अर्ज स्वीकारले. त्यापोटी २०१७ पर्यंतचा गृहकर वसूल केला; पण अंमलबजावणी शुन्य आहे. यामुळे योजनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.
सदर योजनेत सरसकट सर्वांना घरकूल देण्यात येईल, अशी भुलथाप देत ग्रा.पं. ने त्यातील अटीप्रमाणे गृहकर भरणे बंधनकारक आहे, असे सांगितले होते. यामुळे नागरिकांनी उसणवार करून मकान कर, पाणी कर व दिवाबत्ती कर अदा केला; पण घराचे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही. गावातील ८० टक्के नागरिकांनी घरकुलासाठी अर्ज केले. त्यापोटी ग्रा.पं. ची लाखो रुपयांची वसुली झाली; पण प्रत्यक्षात तालुक्यात हजारो अर्ज आले असताना प्रत्यक्षात मंजूर घरकूल फार कमी आहे. सेलू तालुक्यात ३६२ घरकूल मंजूर झाले असून ओबीसींसाठी केवळ ८८ घरकूल आले. इतर ४४ व उर्वरित घरकूल अनु. जाती, जमातीसाठी आहे. शासनाने कर वसुलीसाठी गावांतून हजारो अर्ज घेतले. यात भूमिहिन प्रमाणपत्र, बँकेत खाते उघडणे व कर भरणे यासाठी पदरचा पैसा खर्च केला; पण घरकूल मृगजळ ठरली, असा आरोप बीडीओंना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)