‘पत्नीच्या नावे घर’ निर्णयाची ६० दिवसांत अंमलबजावणी करा
By admin | Published: August 17, 2016 12:48 AM2016-08-17T00:48:44+5:302016-08-17T00:48:44+5:30
ग्रा.पं. क्षेत्रातील सर्व घरांवर पुरूषांच्या बरोबरीने त्याच्या पत्नीची मालकी हक्क पत्रात नोंद करा, असा शासन निर्णय आहे.
धरणे आंदोलन : कविताचे घर जिल्हाधिकाऱ्यांनी परत करण्याची मागणी
वर्धा : ग्रा.पं. क्षेत्रातील सर्व घरांवर पुरूषांच्या बरोबरीने त्याच्या पत्नीची मालकी हक्क पत्रात नोंद करा, असा शासन निर्णय आहे. जिल्हाधिकारी व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याकडे कधीही लक्ष दिले नाही. परिणामी, अनेक महिलांना हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागते. परडा येथील कविता मुंगले हिलाही असाच त्रास सहन करावा लागत आहे. तिला जिल्हाधिकाऱ्यांनीच घर परत करावे, अशी मागणी करीत समता परिषदेने मंगळवारी धरणे आंदोलन केले.
दोन वर्षांपूर्वी ग्रा.पं. ला घरावर पतीच्या बरोबरीने आपले नाव नोंदवावे, अशी लेखी विनंती केली होती; पण त्यांनी तिचे ऐकले नाही. परिणामी, व्यसनी नवऱ्याने तिला माहिती न होऊ देता घर विकले. दोन लहान मुलांसह तिला घराबाहेर काढले. याला प्रशासनच जबाबदार आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रा.पं. मध्ये शोध मोहीम घेऊन ६० दिवसांच्या आत सर्व घरांवर पुरूषांच्या बरोबरीने त्यांच्या पत्नीच्या नावांची नोंद मालकी हक्क पत्रांवर करावी व ते मालकी पत्र महिलांना द्यावे. कविताचे घर जिल्हाधिकारी व सर्व अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारीमुळे विकले गेले. यामुळे जिल्हाधिकारी व जि.प. सीइओ यांनी पुढाकार घेऊन कविताच्या घराची विक्री रद्द करावी. तिला तिचे घर सन्मानाने परत करावे, अशी मागणी करण्यात आली. असे न झाल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी म. फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, विजय मुळे उपस्थित होते.
आंदोलनाला किसान अधिकार अभियान, राष्ट्रवादी किसान सभा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस ने पाठींबा देत सहभाग घेतला. धरणे आंदोलनात कविता मुंगले, अविनाश काकडे, किशोर माथनकर, राकाँ. जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, महिला राकाँ अध्यक्ष शरयू वांदिले, महिला काँग्रेस अध्यक्ष हेमलता मेघे, विजय मुळे, निळकंठ पिसे, सुधीर पांगूळ, निळकंठ राऊत, अंबादास चौधरी, शैलेश येळणे, प्रा. खलील खतिब, शारदा केने, सुमन राहणे, नंदिनी राऊत आदींनी सहभाग घेतला.(कार्यालय प्रतिनिधी)