नागरिकांना पटवून दिले जलसंवर्धनाचे महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:49 PM2018-01-17T23:49:00+5:302018-01-17T23:49:13+5:30
पाणी फाऊनडेशनच्यावतीने आयोजित सत्येमय जयते वाटर कप स्पर्धेची तालुकास्तरीय कार्यशाळा येथील विद्या भारती महाविद्यालयात पार पडली. यावेळी उपस्थितांना तज्ज्ञ मान्यवरांनी जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : पाणी फाऊनडेशनच्यावतीने आयोजित सत्येमय जयते वाटर कप स्पर्धेची तालुकास्तरीय कार्यशाळा येथील विद्या भारती महाविद्यालयात पार पडली. यावेळी उपस्थितांना तज्ज्ञ मान्यवरांनी जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार महेंद्र सोनुने, गटविकास अधिकारी डॉ. संघमित्रा कोल्हे, डॉ. उल्लास जाजू, दौलत, डॉ. प्रा. संजय कानोडे, भरत घेर, अशोक सूर्यवंशी, अमीत दळवी आदींची उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना तहसीलदार सोनुने यांनी पाणी फाऊनडेशन अंतर्गत सत्येमय जयते वाटर कप -३ स्पर्धेमुळे तालुक्यातील गावांना पाणीदार करण्याची संधी चालुन आलेली आहे. या प्रक्रियेत आतापर्यंत तालुक्यातील ७६ गावांनी सहभाग नोंदविला आहे. ही प्रक्रिया अधीक गतिमान करण्यासाठी गावातील लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे. या प्रक्रिये दरम्यान गावात झालेल्या कामाला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामाची जोड देता येईल. त्यातून गावाची प्रगती नक्कीच साधता येईल. आपण सर्व मिळून एक व्यापक पाण्याची लोक चळवळ बनवू या, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
डॉ. उल्लास जाजू म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. परंतु, सध्या त्याने सेंद्रीय शेतीकडे वळले पाहिजे. कारण ती काळाची गरज आहे. रासायनिक शेती शेतकºयांची उडचण वाढविणारीच ठरत असल्याचे दिसून येते. त्यामुळे सेंद्रीय शेती करणाºयांना प्रोत्साहनही देणे गरजेचे आहे. शेतकरी समृद्ध होण्यासाठी त्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविणे गरजेचे आहे. संपूर्ण परिसर पाणीदार बनविण्याची संधी ग्रामस्थांपर्यंत चालून आली आहे. त्याचा लाभ घेतला पाहिजे. पाणी फाऊनटेशनच्या नागरिकांनी सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.
गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे यांनी सांगितले की, दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी हा उपक्रम फायद्याचा ठरणारा आहे. या प्रक्रियेतून आपल्याला दुष्काळाकडून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग नक्कीच मिळेल. सरकारी पातळीवरून आपल्याला योग्य अशी मदत मिळेल. शोष खड्डे, रोपवाटिका, शेततळे आदी कामे आपण श्रमदानातून केली पाहिजे. तेव्हाच हा उपक्रम एक लोकचळवळ म्हणून पुढे येईल आणि आपले गाव पाणीदार बनेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी काकडदरा येथील वाटर हिरोज दौलतभाऊ यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अशोक सूर्यवंशी यांनी केले. संचालन भरत घेर यांनी केले तर आभार किरण यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य आदींची उपस्थिती होती.