डॉ.बाबासाहेबांचे राष्ट्रनिर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 10:10 PM2019-04-18T22:10:01+5:302019-04-18T22:10:27+5:30
जगात सर्वात महान व्यक्ती कोण? यासंदर्भात २०१४ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना एकूण मताच्या ६० टक्के मते मिळाली. त्यामुळे ते भारतातच नव्हे तर जगातही सर्वात महान व्यक्ती ठरले. अनेक देशातील जनतेनेही त्यांना प्रथम क्रमांकावर ठेवण्यास पुढाकार घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जगात सर्वात महान व्यक्ती कोण? यासंदर्भात २०१४ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना एकूण मताच्या ६० टक्के मते मिळाली. त्यामुळे ते भारतातच नव्हे तर जगातही सर्वात महान व्यक्ती ठरले. अनेक देशातील जनतेनेही त्यांना प्रथम क्रमांकावर ठेवण्यास पुढाकार घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, विचार सर्वांसाठीच प्रेरक असून त्यांचे राष्ट्रनिर्मितीतही फार मोठे योगदान लाभले आहे, असे प्रतिपादन माजी गृहमंत्री तथा निर्वाचित तिबेट सरकारच्या उपसभापती ग्यारी डोल्मा यांनी केले.
स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ग्यारी डोल्मा बोलत होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या छाया खोब्रागडे, जिल्हा परिषद सदस्य विजय आगलावे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर, प्रेरणा कुंभारे व विधान वनकर यांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी बाबासाहेबांची जयंती फक्त एक दिवस नाही तर वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाने सामाजिक बांधिलकी जोपासत साजरी केली जाते. यादरम्यान विविध स्पर्धा व उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले असून महामानवाच्या जयंती वर्षोत्सवाचा समारोप २६ जानेवारी २०२० रोजी होईल, अशी माहिती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मुनेश्वर यांनी प्रास्ताविकातून दिली.
मंचावर उपस्थित इतरही मान्यवरांनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमादरम्यान भीम सैनिकांनी दिलेल्या जय भीमच्या गर्जनेने व टाळ्यांनी संपुर्ण परिसर दुमदुमला होता. परिसंवादानंतर सांची जीवने हिने ‘मी रमाबाई आंबेडकर बोलतेय’ हे एकपात्री नाटक सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. सोबतच रवि ढोबळे यांच्या संचाचा शीतल स्वरांजली कार्यक्रम पार पडला. संचालन समितीचे उपाध्यक्ष राहुल झामरे तर आभार उज्वल हाडके यांनी मानले.
कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता समितीचे सल्लागार अरविंद निकोसे, महासचिव उमेश जिंदे, अशोक खन्नाडे, अतुल दिवे, विशाल रामटेके, नितिन कुंभारे, उपाध्यक्ष सुनिल वनकर, कोषाध्यक्ष प्रवीण पोळके, रमेश निमसरकर, मिलिंद साखरकर, हेमंत जाधव, निशिकांत गोटे, पुरुषोत्तम भगत, जयकांत पाटिल, किशोर फुसाटे, अथर अली, प्रकाश कांबळे, राजु थुल, प्रणय कांबळे, अनिल नगराळे, मंगेश सुर्यवंशी, सुरेश उमरे, राष्ट्रपाल गणवीर, अरविंद भगत, सतिश इंगळे, संजय बहादुरे, जगदिश जवादे, सुरेंद्र पुनवटकर, देवानंद तेलतुंबडे आणि संयोजनामध्ये समता सैनिक दल, भीम टायगर सेना व भीम आर्मी आदिंनी अथक परिश्रम घेतले.यावेळी अनुयायी उपस्थित होते.