शेडगाव फाट्यावरील अपघातप्रवण स्थळाची सुधारणा करा
By admin | Published: June 19, 2017 01:14 AM2017-06-19T01:14:30+5:302017-06-19T01:14:30+5:30
सेवाग्रामकडून समुद्रपूरकडे जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक २५८ ला जोडणाऱ्या शेडगाव फाट्यावरील अपघातप्रवण स्थळाची सुधारणा करावी.
रामदास तडस यांची मागणी : केंद्रीय मंत्र्यांकडे प्रस्ताव सादर
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेवाग्रामकडून समुद्रपूरकडे जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक २५८ ला जोडणाऱ्या शेडगाव फाट्यावरील अपघातप्रवण स्थळाची सुधारणा करावी. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ याच चौरस्त्यावरुन जातो. त्यामुळे येथे अपघाताच्या घटना वारंवार घडत असल्याने त्वरीत सुधारणा करावी, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
वर्धेवरुन समुद्र्रपूर, उमरेडकडे जाणारा राज्य महामार्ग व नागपूर हैद्राबाद हा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत वर्दळीचे आहे. शेडगाव फाट्यावर गंभीर अपघात होतात. नुकत्याच झालेल्या अपघातत चार जण ठार झाले होते. या घटनेची दखल घेऊन खासदार तडस यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक, नागपूर यांना शेडगाव चौरस्त्याच्या सुधारणेकरिता प्रस्ताव, अपघाताची संक्षिप्त टिपणी सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्याला अनुसरुन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने संक्षिप्त टिपणी व अहवाल खासदार तडस यांच्याकडे सादर केला. या अहवालाच्या आधारे शेडगाव चौरस्त्यावर सुधाणा करण्याची मागणी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.ना. गडकरी यांनी या घटनेची दखल घेत सदर प्रकरण पुढील कार्यवाहीकरिता विचारधीन असल्याचे सांगितले. यापूर्वी शेडगाव फाटयावर अनेक अपघात झाले आहे. रस्त्याच्या सुधारणांची मागणी नागरिकांनी केली आहे. यावर १९ जून ला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अध्यक्ष यांच्यासोबत कार्यालयीन भेट घेणार असून या बैठकीत शेडगाव फाट्याच्या दुरुस्तीकरीता मागणी रेटून धरणार असल्याचे खा. तडस यांनी सांगितले.