थेट उत्पादक ते ग्राहक दुध पुरवठ्याच्या साखळीत सुधारणा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:56 PM2018-05-18T23:56:25+5:302018-05-18T23:56:25+5:30
थेट उत्पादक ते ग्राहक या दुध पुरवठ्याच्या साखळीमध्ये सुधारणा व्हावी व आजस्थितीला दुधाला कमीत कमी ७० ते १०० रुपये प्रती लीटर भाव मिळावा, अशी मागणी वर्धा जिल्ह्यातील दुग्ध उत्पादकांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : थेट उत्पादक ते ग्राहक या दुध पुरवठ्याच्या साखळीमध्ये सुधारणा व्हावी व आजस्थितीला दुधाला कमीत कमी ७० ते १०० रुपये प्रती लीटर भाव मिळावा, अशी मागणी वर्धा जिल्ह्यातील दुग्ध उत्पादकांनी केली आहे.
वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहेत. अशी परिस्थिती असतानाही अनेक शेतकरी पशुपालनाचा व दुग्ध व्यवसाय करीत आहेत. शासनाकडून पशुपालन व्यवसाय करणाºया दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणतीही प्रभावी योजना नाही. त्यामुळे अनेकजण कर्ज काढून हे काम करीत आहेत. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने प्रत्येक पशुपालकाला मोफत पशुखाद्य व चारा उपलब्ध करावा. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी दुधाचे उत्पादन होते तेथे पाकीटमधील दुधाच्या विक्रीवर प्रतिबंध घालावेत. गावराण प्रजातीच्या गायींचे दूध स्वास्थ्यवर्धक व आरोग्यदायी असते, यात तिळमात्र शंका नाही. मात्र, या गायींच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने उत्पादन क्षमता शून्यापर्यंत आली आहे. शासकीय यंत्रणेने स्वत: या जनावरांचे शास्त्रशुद्ध संवर्र्धन करून अत्याधुनिक तंत्राच्या सहाय्याने त्याची उत्पादन क्षमता कमीत कमी १५ ते २० लीटर प्रती दिवस करावी. तोपर्यंत शेतकऱ्यांना व पशुपालकांना त्यांच्या संवर्धनासाठी आग्रह धरू नये. जनावरांबाबत पशुमालकांना योग्य सल्ला द्यावा. ज्या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी आहे त्या समजून घेवून ते तोट्यात जाणार नाही यासाठी त्यांना मदत करण्याची भूमिका सरकारने घ्यावी, अशी मागणीही दुग्ध उत्पादकांनी केली आहे.
योग्य दराची अपेक्षा
पशुपालकांना उन्हाळ्याच्या दिवसात जनावरांच्या चाऱ्यासाठी भटकंती करावी लागते. शिवाय योग्य दर मिळत नाही. दुधाला योग्य दर देण्याची मागणी आहे.