रेल्वे स्थानकावरील आश्रम स्थापना वर्षाच्या नोंदीत सुधारणा
By admin | Published: January 22, 2016 03:00 AM2016-01-22T03:00:42+5:302016-01-22T03:00:42+5:30
वर्धा रेल्वे स्थानकावरील आश्रम स्थापनेची नोंद चुकीची होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची
लोकमतच्या वृत्ताची दखल : पर्यटक आणि अभ्यासकांतील संभ्रम झाला दूर
सेवाग्राम : वर्धा रेल्वे स्थानकावरील आश्रम स्थापनेची नोंद चुकीची होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत रेल्वे प्रशासनाने चुकीची दुरुस्ती केली. ऐतिहासिक नोंदीमध्ये सुधारणा केल्याने अभ्यासक व पर्यटकांतील संभ्रम दूर झाला आहे.
वर्धा रेल्वे स्थानकावर फलाट क्र. १ व २ वरील संगमवर फलकावर महात्मा गांधी यांच्याबाबत माहिती तसेच सेवाग्राम आश्रम स्थापनेबाबत नोंद आहे. यात १९३४ मध्ये जमनालाल बजाज यांनी दान केलेल्या ‘शेगाव’ येथील भूमीवर आश्रम स्थापन करण्यात आला, असा मजकूर नमूद करण्यात आलेला होता. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित करून १९३४ चुकीचे असल्याचे लक्षात आणून दिले होते. गांधीजी ३० एप्रिल १९३६ रोजी शेगाव या गावी आले. नंतर आश्रमची स्थापना झाली. याबाबत स्टेशन उपप्रबंधक जे.डी. कुलकर्णी यांच्याशी पत्रव्यवहार झाला. पुरावे सादर करण्यात आले. जी.डी. कुलकर्णी यांनी आयडब्ल्यूडी विभागाला पत्र पाठवून चुकीची नोंद असल्याचे लक्षात आणून दिले. पुरावे दिल्याने रेल्वे प्रशासनालाही ही चुक लक्षात आल्याने चुक दुरूस्तीचा निर्णय झाला.
यावरून आयडब्ल्यूडी विभागाचे बी.पी. सिंग यांनी दखल घेत डीआरएम नागपूर यांच्याशी पत्रव्यवहार केला. रेल्वे प्रशासनाने १९३४ ऐवजी १९३६ केल्याने चुकीचा इतिहास पुसला गेला आणि संभ्रमही दूर झाला.(वार्ताहर)
आश्रम प्रतिष्ठाण, गांधी सेवा संघाचा दुजोरा
४वर्धा रेल्वे स्थानकावरील नोंद चुकीची असल्याच्या बाबीला गांधी सेवा संघाचे अध्यक्ष कनकमल गांधी, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री प्रा.डॉ. श्रीराम जाधव, कुसूम पांडे यांनीही दुजोरा दिला होता. यामुळे दुरूस्ती करणे शक्य झाले.
रेल्वे स्थानकावरील नोंद दुरूस्त करण्यात आली आहे. पुरावा महत्त्वाचा होता. तोही प्राप्त झाल्याने अधिक सोईचे झाले.
- जे.डी. कुलकर्णी, स्टेशन उपप्रबंधक, वर्धा .
दै. लोकमतमधील वृत्त, पुरावे तसेच गांधी सेवा संघ व आश्रम प्रतिष्ठानचे पत्र मिळाले. नागपूरच्या डीएमआर विभागाला पाठविले होते. पुरव्यामुळे सुधारणा शक्य झाली.
- बी.पी. सिंग, आय. डब्ल्यू. डी. विभाग, वर्धा .