शाळांमधील शुद्ध पाणी पुरवठा यंत्रात ‘झेडपी’ची अशुद्धता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 11:44 PM2018-09-18T23:44:38+5:302018-09-18T23:46:18+5:30
चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून तालुक्यातील शाळांना शुध्द पाणी पुरवठा यंत्र पुरविण्यात आले आहे. विशेषत: शाळांकडून मागणी नसतांनाही जिल्हा परिषद यंत्रणेकडून हे यंत्र थोपविण्यात आल्याने अल्पावधीतच त्याची वाट लागली आहे.
सुधीर खडसे।
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून तालुक्यातील शाळांना शुध्द पाणी पुरवठा यंत्र पुरविण्यात आले आहे. विशेषत: शाळांकडून मागणी नसतांनाही जिल्हा परिषद यंत्रणेकडून हे यंत्र थोपविण्यात आल्याने अल्पावधीतच त्याची वाट लागली आहे. यामुळे या यंत्र पुरवठ्यातही जिल्हा परिषदेच्या अशुध्द कारभाराची दुर्गंधी येत असल्याची ओरड होत आहे.
गावाचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने चौदाव्या वित्त आयोगातून थेट ग्रामपंचायतला निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ग्रामपंचायतींना निधीही पुरविला जात आहे. चौदावे वित्त आयोग या शिर्षाखाली ग्राम पंचायतींना गावाची एकूण लोकसंख्या गुणीला ४०९ रूपये या प्रमाणात एकत्रित निधी दिल्या जातो. या निधीतून शाळा, आरोग्य, मानवी विकास आणि महिला बालकल्याण याकरिता २५ टक्के निधी दरवर्षी खर्च करण्याचे निर्देश आहे. परंतू संबंधीत यंत्रणा शाळांना योग्य माहिती देत नसल्याने मानवी विकास व आरोग्य, खेळ साहित्य व बालविकास साधनाकरिता फारसा खर्च केल्या जात नाही, हे वास्तव आहेत. त्यामुळे शाळांच्या मागणीला दुर ठेऊन जिल्हा परिषद स्तरांवरील पदाधिकारी व अधिकारी आपल्या निकटवर्तीयांची तुमडी भरण्यासाठी स्वमर्जीने ठरविलेल्या वस्तू चौदाव्या वित्त आयोगातील निधीतून थोपवित आहे. त्यामुळे निकृष्ठ दर्जाच्या असलेल्या वस्तुंही गुपचूप स्विकाराव्या लागत असल्याने अल्पावधीच त्यांची वाट लागत असून शासनाच्या कोट्यवधीचा निधी व्यर्थ जात आहे.
चार महिन्यातच यंत्राची लागली वाट
सत्र २०१७-१८ मध्ये अर्धे सत्र संपताच मागणी नसतानाही जिल्हा परिषदेच्या विविध शाळांना शुद्ध पाणी पुरवठा यंत्र पुरविण्यात आले. पुरवठादाराच्या चमुने एक हजार लीटरच्या सुप्रिम कंपनीच्या दोन टाक्या, २० लीटरचा स्टोरेज ड्रम, ५० ते ६० फुट पारस कंपनीचे पाईप असलेली नळ वाहिनी, प्रि आणि मेमब्रन्ट असलेले तीन छोटे फिल्टर आणि एक पाणी घेण्याचा नळ बसविण्यात आला.या साहित्याची किंमत बाजार भावाप्रमाणे ४० ते ४५ हजाराच्या आसपास आहे. परंतु ग्राम पंचायतींनी लाख रुपये या पुरवठादाराला दिल्याचे कळते. या यंत्राची चार महिन्यातच हालत बिघडली आहे. जमिनीत बसविलेली टाकी अलगद जमिनीच्या वर आली. पाईपलाईन तुटली, फिल्टर व पाणी पुरवठ्याच्या टिल्लू मोटरपंपाला चार ते सहा महिन्यातच घरघर लागली आहे.
जिल्हा परिषद स्तरावरुन दबाव
समुद्रपूर तालुक्यातील गणेशपूर, मंगरूळ पुनर्वसन, दसोडा, खेक, सिल्ली, साखरा, ताडगाव, वाचनचुवा, तळोदी यासह अनेक गावांतील शाळांत हे यंत्र बसविलेले आहे.हे यंत्र बसविण्यासाठी आणि पुरवठादाराचे देयक देण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरुन ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव टाकल्या जातात. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या हक्काच्या निधीवरही जिल्हा परिषद प्रशासनाचा डोळा असून मागणी नसतानाही वस्तू लादून अस्वच्छ कारभार चालविला असून या प्रकरणाची चौकशी करुन कार्यवाही करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.