देऊरवाड्यात ११० घरांत शिरले पावसाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2022 05:00 AM2022-07-06T05:00:00+5:302022-07-06T05:00:15+5:30
साेमवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली असली तरी तालुक्यातील आर्वी, वाठोडा, वाढोणा, विरुळ, रोहणा व खरांगणा येथे अतिवृष्टीच झाली आहे. याच पावसादरम्यान देऊरवाडा परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. सततच्या पावसामुळे दोन घरांची पडझड झाली असून, अनेकांना तीन ते चार फूट पाण्यातून मार्ग काढून सुरक्षित ठिकाण गाठावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा (आर्वी) : सोमवारी रात्री सुरू झालेल्या संततधार पावसाने मंगळवारी सकाळी विश्रांती घेतली. याच पावसादरम्यान देऊरवाडा येथील तब्बल ११० घरांत पावसाचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.
साेमवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली असली तरी तालुक्यातील आर्वी, वाठोडा, वाढोणा, विरुळ, रोहणा व खरांगणा येथे अतिवृष्टीच झाली आहे. याच पावसादरम्यान देऊरवाडा परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
सततच्या पावसामुळे दोन घरांची पडझड झाली असून, अनेकांना तीन ते चार फूट पाण्यातून मार्ग काढून सुरक्षित ठिकाण गाठावे लागले. नुकसानग्रस्तांना शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांची आहे.
थोडक्यात बचावली ‘आशा’
- शोभा मधुकर थोरात (६७) या पहाटेच्या सुमारास झोपेत असताना काही तरी पडल्याचा जोराचा आवाज झाला. अशातच ‘आशा’चा मुलगा खडबडून जागा झाला. त्याने तातडीने वृद्ध आईसह घरातून पळ काढल्याने ते थोडक्यात बचावले.
- विशेष म्हणजे या माय-लेकांनी घराबाहेर पळ काढताच अवघ्या काही मिनिटांत थोरात यांचे घर जमीनदोस्त झाले. तर मधुकर गवळी यांच्या घराचा काही भाग कोसळल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
तीन ते चार फूट पाण्यातून काढावा लागला मार्ग
- पावसाचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. अशातच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी तीन ते चार फूट पाण्यातून मार्ग काढावा लागला. विशेष म्हणजे रस्त्यावरही तीन ते चार फूट पाणी साचले होते.
संसार आला उघड्यावर
- इंदू उईके, नंदा छत्रपती दाभाडे, रामकृष्ण शिरसागर, संजय पुंडे, मनोहर मेश्राम, शेख मुस्तफा, दिवाकर खैरकर, अशोक खडसे, संतोष खडसे, सुधीर खडसे, सुभाष खरकुटे, देवीदास धाडगावे, हरिदास दाभाडे, मनोहर मानकर यांच्यासह तब्बल ११० घरांत पावसाचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याची मोठी नासाडी झाली आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबीयांचा संसार उघड्यावर आला असून, या नुकसानग्रस्तांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.