अन् आई-वडिलांसमोरच मुलीने प्रियकरासोबत ठोकली धूम; घरच्यांची पोलिसात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2022 05:53 PM2022-05-28T17:53:45+5:302022-05-28T18:01:23+5:30
मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही अक्षय नामक मुलाने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार घरच्यांनी तळेगाव पोलिसात दिली.
वर्धा : ‘प्रेमात सर्व काही बरोबर’ मगं ते प्रेम आंधळं असलं तरी चालेल... ज्या आई-वडिलांनी आयुष्यभर झटून मुला-बाळांचे पालन पोषण केले...त्याच आई-वडिलांना झुगारून मुलांची चक्क आई- वडिलांना सोडण्यापर्यंत मजल गेली आहे. असाच काहीसा प्रकार तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारडी फाट्याजवळ घडला. प्रियकराच्या घरून ताब्यात घेतल्यानंतर मुलीने पुन्हा त्यांच्याच समोर प्रियकराच्या दुचाकीवर बसून धूम ठोकल्याची घटना घडली. घरच्यांनी याबाबतची तक्रार तळेगाव पोलिसात दाखल केली.
पोलिसांनी मुलगी अल्पवयीन असल्याने प्रियकराविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. १७ वर्षीय मुलीचे अक्षय नामक मुलाशी प्रेम फुलले, दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्याने लग्न करणे कायद्याने गुन्हा समजला जात असल्याने घरच्यांनी त्यांच्या या नात्याला विरोध केला. मात्र, घरच्यांच्या विरोधाला झुगारून मुलीने घरातून पळ काढला आणि थेट प्रियकरासोबत राहू लागली.
याची माहिती घरच्यांनी मिळाली असता घरच्यांनी मुलाच्या घरी जाऊन मुलीची समजूत काढून अजून तुझे वय लहान आहे, वयात आल्यावर लग्न करा, असे समजावून मुलीला देववाडी येथून मुलाच्या घरातून ताब्यात घेत घरी जात होते. मात्र, पारडी फाट्याजवळ मुलीने लघुशंकेचा बहाणा सांगून कार थांबवायला सांगितली. चालकाने कार थांबविली असता मुलगी कारखाली उतरली. काही वेळातच पारडी फाट्यावर मुलीचा प्रियकर अक्षय दुचाकीवर आला. मुलीने घरच्यांसमोरच मुलाच्या दुचाकीवर बसून धूम ठोकली.
मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही अक्षय नामक मुलाने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार घरच्यांनी तळेगाव पोलिसात दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती दिली.
अल्पवयीन मुली पळून जाण्याच्या घटनांत वाढ
हिंगणघाट शहरातील वास्तव्यास असलेली १२ व्या वर्गात शिकणारी मुलगी मैत्रिणीकडे जातो, असे सांगून घरातून निघाली. ती घरी परतली नसल्याने घरच्यांनी तिचा शोध घेतला. पण कुठेही मिळून न आल्याने तिला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार घरच्यांनी हिंगणघाट पोलिसात दिली.
परिचितानेच पळवून नेले अल्पवयीन मुलीला
अवघ्या १६ वर्षीय मुलीला तिच्याच नात्यातील मुलाने फूस लावून पळवून नेल्याची घटना सावंगी ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. अल्पवयीन मुलगी आणि आरोपी हे दोघेही नातेवाईक असून लग्नाचे आमिष देत मुलीला फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी सावंगी ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
मोबाइल अन् इंटरनेट ठरतोय घातक
सध्या लहान वयापासूनच मुलांना मोबाइलचे वेड लागल्याने इंटरनेटवर तास न तास वेळ घालवतात. मात्र, याकडे पालकांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने अल्पवयीन मुली टोकाचे पाऊल उचलतात. त्यामुळे पालकांनी आपली मुलगी, काय पाहतेय, कुणाशी मैत्री करतेय, याची चौकशी करण्याची गरज आहे.