गेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १७४ मतदान केंद्रांवर ५० टक्केही मतदान नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 07:09 PM2024-03-15T19:09:59+5:302024-03-15T19:10:21+5:30
सर्वाधिक मतदान केंद्र वर्धा शहरात, त्या खालोखाल देवळी, हिंगणघाट, आर्वीचा समावेश
चेतन बेले, वर्धा: लोकसभा मतदारसंघात सन २०१९ च्या निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या १७४ मतदान केंद्रांचा समावेश आहे. यात सर्वाधिक कमी मतदान वर्धा शहरातलग असलेल्या १२८ मतदार केंद्रांवर झाले होते. तर त्यापाठोपाठ देवळी हिंगणघाट आणि आर्वीचा समावेश आहे.
मतदानाची टक्केवारी ६५ टक्यांपर्यंत वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मायक्रो प्लॅनिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात ११ लाख ४९ हजार ९५८ मतदार होते. या निवडणुकीत १७४ मतदान केंद्रावर ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले. यात बऱ्याच गावांत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला होता.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक विभागाकडून मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले होते. यात मतदारयादी शुद्धीकरण, गृहभेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. गावागावांत पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली, तर महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणी शिबिर राबविण्यात आले. तोंडावर असलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वच मतदान केंद्रांवर किमान ६५ ते ७० टक्के तरी मतदान व्हावे, यासाठी अधिकाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे.
निवडणुकीवेळी त्या गावातील मतदार नेमके कोठे जातात, मतदानाला का येत नाहीत, त्यामागील कारणांचा शोध घेण्यात आला. ग्रामीण क्षेत्राच्या तुलनेत शहर मतदारांमध्ये केवळ आणि केवळ नागरिकांची उदासीनता असल्याचे दिसून आले आहे.
लोकसभा निवडणुकीत टक्का वाढेना- लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर ५० ते ८७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्कच बजावला नाही. पाच वर्षांतून एकदा निवडणूक येते, तरीदेखील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा स्थानिक निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा व लोकसभा निवडणुकीवेळीच मतदानाची टक्केवारी कमी का राहते, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
१७ हजार नवमतदारांची नोंदणी- पूर्वी वर्षातून एकदाच मतदान नोंदणी करता येत होती. मात्र यात बदल करीत वर्षातून ३ वेळा नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे महाविद्यालयात नवमतदारांसाठी नोंदणी शिबिर राबवीत यात १७ हजार ४२७ नवमतदारांची नोंदणी केली आहे. शिवाय वर्षभरात १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या मतदारांची नोंदणी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
२९ हजार ७०९ मतदार गळाले- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात ११ लाख ४९ हजार ९५८ मतदार होते. मतदार शुद्धीकरणात दुबार मतदार आणि हयात नसलेल्या व्यक्तींची नावे वगळण्यात आली. यात मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारावर तब्बल २८ हजार ४०० तर दुबार नोंदणी असलेल्या १ हजार ३०९ असे एकूण २९ हजार ७०९ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.
१०.८९ लाख मतदार- मतदार शुद्धीकरण यादी तयार करण्यासाठी गतवर्षी जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट महिन्यात १३० बीएलओच्या माध्यमातून जिल्ह्यात ३ लाख ९ हजार ८४६ गृहभेटी देण्यात आल्या. यात दुबार नोंदणी असलेल्या मतदारांना ऐच्छिक एका ठिकणी मतदान करण्याचा अधिकार कायम ठेवत यादीतून नाव वगळण्यात आले. जुने व नवीन असे जिल्ह्यात सध्या १० लाख ८९ हजार १७४ मतदारांची नोंद आहे.
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी क्षेत्रातील मतदारांत मतदान करण्यात उदासीनता दिसून येत आहे. सर्वाधिक वर्धालगत असून काही मतदान केंद्रावर १३ टक्के मतदानाची नोंद घेण्यात आली होती. त्यामुळे तोंडावर असलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सरासरीपेक्षा जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहे.
- अनिल गावित, उपजिल्हाधिकारी, निवडणूक वर्धा.
मतदान कमी असणारी विधानसभानिहाय मतदान केंद्र
आर्वी - १३
देवळी- २१
हिंगणघाट- १४
वर्धा - १२८