क्षुल्लक वाद भोवला अन् शुभमने आशिषची हत्या करून काटा काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2022 05:00 AM2022-06-02T05:00:00+5:302022-06-02T05:00:15+5:30
वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. अन् संतापलेल्या शुभम जयस्वाल याने काठीने मारहाण करणे सुरू केले. तेवढ्यातच शुभमचे वडील लक्ष्मीनारायण तेथे आले आणि त्यांनीही मारहाण करण्यास सुरुवात केली. मृत आशिषला जमिनीवर पाडून त्याच्यावर दगडाने प्रहार केला. त्यानंतर चक्क धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून तेथून पळ काढला. रक्तबंबाळ अवस्थेत आशिष जमिनीवर निपचित पडून होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वडिलांशी वाद का घातला, याचा जाब विचारण्यास गेलेल्या अवघ्या २७ वर्षीय युवकाला दगडाने ठेचून तसेच मानेवर धारदार शस्त्राने वार करीत हत्या करण्यात आल्याची घटना शहरातील स्टेशनफैल परिसरात ३१ मे रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने स्टेशनफैल परिसर चांगलाच हादरून गेला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बाप-लेकासह त्याच्या मावस भावाला रात्रीच बेड्या ठोकल्या. आशिष आनंद रणधीर (२७, रा. स्टेशनफैल) असे मृत युवकाचे नाव आहे. तर पोलिसांनी याप्रकरणात शुभम जयस्वाल (२७), वडील लक्ष्मीनारायण जयस्वाल (६४) आणि आदित्य जयस्वाल यांना अटक केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी दिली.
मृत आशिष रणधीर आणि आरोपी शुभम जयस्वाल हे दोघेही एकाच परिसरातील रहिवासी असून अगदी काही अंतरावर दोघांचीही घरे आहेत. मृत आशिषचे वडील आनंद रणधीर यांचा ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास आरोपी शुभम जयस्वाल याच्याशी वाद झाला होता. दऱम्यान, आशिषने मध्यस्थी केली असता तोंडी वाद झाला होता. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मृत आशिष हा घरासमोरील चौकात गेला असता तेथे पुन्हा आरोपी शुभमने वाद घातला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. अन् संतापलेल्या शुभम जयस्वाल याने काठीने मारहाण करणे सुरू केले. तेवढ्यातच शुभमचे वडील लक्ष्मीनारायण तेथे आले आणि त्यांनीही मारहाण करण्यास सुरुवात केली.
मृत आशिषला जमिनीवर पाडून त्याच्यावर दगडाने प्रहार केला. त्यानंतर चक्क धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून तेथून पळ काढला. रक्तबंबाळ अवस्थेत आशिष जमिनीवर निपचित पडून होता. त्याच्या दोन मित्रांनी त्याला दुचाकीवर बसवून सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय गाठले. मात्र, उपचार करण्यापूर्वीच त्याने श्वास सोडला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून प्रकरण जाणून घेत रात्रीच तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप करीत आहेत.
वडिलांच्या डोळ्यादेखत घडला प्रकार
- आशिषला मारहाण करतेवेळी त्याचे वडील आनंद रणधीर हे वाद सोडविण्यासाठी मध्यस्थीला गेले होते. त्यांनी आशिषला वाचविण्याचा प्रयत्न केला. बचावासाठी आरडाओरडही केली. मात्र, कुणीही मदतीला धावले नाही. आरोपींनी आनंद रणधीर यांच्यावरही हल्ला चढविला. त्यांनादेखील धारदार शस्त्राने मारहाण करीत जखमी केले.
पुरावे नष्ट करण्याचा केला प्रयत्न
- घटना घडल्यानंतर आरोपी शुभमचे वडील लक्ष्मीनारायण जयस्वाल आणि शुभमचा मावस भाऊ आदित्य जयस्वाल या दोघांनी रस्त्यावर सांडलेल्या रक्तावर पाणी मारण्याचा प्रयत्न करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार काही महिलांनी मोबाईलमध्ये चित्रीत करून पोलिसांना दाखविल्याने दोघांवरही पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त...
- घटना घडल्यानंतर परिसरात काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांची अतिरिक्त कुमक पाचारण करण्यात आली होती. आरोपी आणि मृताच्या घरासमोरही पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
- पंचनामा केल्यावर मृतक आशीष रणधीर याचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात पाठविला. येथे डॉ. प्रवीण झोपाटे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले.
महिला उतरल्या रस्त्यावर...
- आरोपी शुभम जयस्वाल याचा परिसरातील नागरिकांना त्रास होता. घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचताच अनेक महिलांनी पोलिसांपुढे त्यांचे गाऱ्हाणे सांगितले.
- इतकेच नव्हे तर आमच्या डोळ्यासमोर हा प्रकार झाल्याचेही काहींनी पोलिसांनी घेतलेल्या बयाणात सांगितले.
पोलीस अधीक्षकांची भेट...
- पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी पहाटेच्या सुमारास घटनास्थळी भेट देत पाहणी करून पोलीस अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. आरोपीच्या घराची आणि मृताच्या घराची देखील पाहणी करून नेमके प्रकरण काय ते जाणून घेतले.
अवैध सावकारीच्या जोरावर दंडेली
- जयस्वाल कुटुंबीयांचा महिलांना तसेच परिसरातील नागरिकांना चांगलाच त्रास होता.
- अवैध सावकारकीच्या जोरावर जयस्वाल कुटुंबीय दंडेलशाही करायचे. त्यामुळे त्रासलेल्या महिलांनी पुढे येऊन पोलिसांना ही सर्व माहिती दिल्याची विश्वसनीय माहिती आहे.