तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले; शोषणही केले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 05:57 PM2024-05-03T17:57:45+5:302024-05-03T17:59:50+5:30
Wardha : यवतमाळमधून आरोपीला केली अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेणाऱ्या आरोपीला यवतमाळ येथून अटक करण्यात आली. पीडितेला फूस लावून पळवून नेत तिचे वारंवार शोषण केल्याचीही धक्कादायक बाब उघडकीस आल्याने आरोपीविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २९ एप्रिल रोजी रात्री अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून करण्यात आली.
रामेश्वर शंकर बावणकर (रा. जवळगाव, जि. यवतमाळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे की, सेलू तालुक्यातील एका गावातील रहिवासी १६ वर्षीय पीडिता तिच्या मोठ्या आईकडे राहण्यास गेली होती. यावेळी आरोपी रामेश्वरने तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण करून जाळ्यात ओढत १ ऑगस्ट २०२२ रोजी फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी पीडितेच्या आईने सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपी व पीडितेची गोपनीय माहिती घेतली असता, ते दोघेही यवतमाळ जिल्ह्यातील बोरीअरब येथे राहात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने बोरीअरब येथे जात शोधमोहीम राबवली असता, आरोपीच्या शेतातील बंड्यात दोघेही सापडले.
दोघांना ताब्यात घेत वर्धा येथे आणून तपास केला असता, आरोपीने पीडितेला स्वतःच्या घरी नेत वारंवार शोषण केल्याचे समजले. पोलिसांनी गुन्ह्यात वाढ करून पोक्सो कायद्यांतर्गत आरोपीला अटक करून पीडित मुलीला सेलू पोलिसांच्या स्वाधीन केले, पोलिसांनी पीडितेची तपासणी करून तिला पालकांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक भावना धुमाळे, पोलिस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले यांच्या मार्गदर्शनात निरंजन वरभे, नितीन मेश्राम, नवनाथ मुंडे, शबाना शेख, अक्षय राऊत, गोविंद मुंडे यांनी केली.