सेवाग्राम' विकास आराखड्यात मूळ गाव विकासापासून वंचितच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 05:07 PM2024-10-22T17:07:15+5:302024-10-22T17:11:25+5:30
Wardha : गाव विकासाबाबत उदासीनता, नागरिकांची बैठक घेत मांडल्या समस्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : सेवाग्राम गाव ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले. सेवाग्राम विकास आराखड्यात अनेक कामे झाली. यात शंका नाही. पण गावाचा उल्लेख असतानाही मूळ गाव मात्र विकासात्मक कामापासून वंचित राहिले. अन्य गावांचा विकास होत आहे; पण याच गावातील समस्यांबाबत आणि विकासाबाबत उदासीनता का? असा प्रश्न आता गावकऱ्यांसमोर आहे
महात्मा गांधींनी देशाच्या विकासाचे गमक गाव विकासात असल्याचे सांगितले होते. त्या नुसार गाव विकास होणे अपेक्षित होते. मात्र ज्यांची कर्मभूमी राहिली त्या महात्मा गांधींच्या गावात अद्यापही सोई-सुविधा उपलब्ध झाल्या नाही. यात रस्त्यावरील दुकानदारांना पर्यायी जागा, पाणंद रस्ते, स्मशानभूमी, देवस्थान, स्वच्छता, नाला, अरुंद पुलामुळे शेतात जाणारे पाणी, जीर्ण जलकुंभ, जिल्हा परिषद शाळेचे मैदान आदी समस्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षातही कायम आहे.
गाव विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्चाचा सेवाग्राम विकास आराखडा राबविण्यात आला. यातून बापूंची कुटी वगळता आजूबाजूचा परिसर, रस्ता, स्ट्रीट लाइटसह अन्य विकासाची कामे करण्यात आली. मात्र मुख्य गाव यातून वगळण्यात आले. बापूंच्या स्वप्नातील गावाची संकल्पना राबविता अली असती मात्र तसे केले नाही. खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य असे सर्व असतानाही शासकीय यंत्रांना विकास करू शकली नाही. त्यामुळे गावात मूलभूत समस्या अजूनही कायम आहे. यामुळे गाव मागेच राहिल्याचे शल्य आहे. या अनुषंगाने गावातील समस्या मार्गी लावण्यासाठी गावात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी नाना अणकर, रूपेश कडू. दिलीप शेंद्रे, संजय चव्हाण, सुशील कोल्हे, अभय ताकसांडे, नीलेश तिजारे, संजय देशमुख, मुन्ना शेख, संजय गवई, सुरेंद्र कांबळे, विजय नेहारे, सुधाकर शेंडे, विशाल कांबळे, गजानन ताकसांडे, त्र्यंबक नेहारे इ. सह युवा वर्ग उपस्थित राहून चर्चेत सहभागी झाले.
वेळप्रसंगी सत्याग्रहाचे उपसणार हत्यार
गावातील समस्या मार्गी लावणे प्रमुख काम असून या समस्यांवर विचारमंथन करण्यासाठी गावातील हनुमान मंदिर देवस्थान येथे रविवारी २० रोजी बैठक पार पडली. यात मेडिकल चौकातील सौंदर्याकरण, स्वच्छतागृह, रस्त्यावरील दुकानदारांना पर्यायी जागा, पाणंद रस्ते, स्मशानभूमी, देवस्थान, स्वच्छता, नाला, अरुंद पुलामुळे शेतात जाणारे पाणी, जीर्ण जलकुंभ, जिल्हा परिषद शाळेचे मैदान इ. विषयांवर चर्चा करीत लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत आणि शासकीय यंत्रांना यांच्याशी पत्रव्यवहार मार्गी लावण्यासंदर्भात एकमत झाले. पत्रव्यवहाराने विषय मार्गी न लागल्यास वेळप्रसंगी सत्याग्रहाचे हत्यार उपसणार असल्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.