वर्ध्यात छाननीत २७ अर्ज ठरले अवैध; ४४८ उमेदवारांचे अर्ज वैध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 07:55 PM2023-04-05T19:55:08+5:302023-04-05T19:55:32+5:30
हिंगणघाट बाजार समितीच्या संचालकपदाच्या १८ जागांसाठी ६४ उमेदवारांनी अर्ज सादर केले.
महेश सायखेडे
वर्धा : जिल्ह्यातील सात बाजार समितींच्या संचालक पदांच्या १२६ जागांसाठी एकूण ४७५ नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले. याच अर्जांची बुधवारी छाननी केल्यावर तब्बल २७ अर्जांत विविध त्रुट्या आढळल्याने ते अवैध ठरविण्यात आले आहेत. तर ४४८ नामनिर्देशन अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.वर्धा बाजार समितीच्या १८ संचालकपदासाठी एकूण ७३ नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी तीन अर्ज छाननीत अवैध ठरले. पुलगाव बाजार समितीच्या १८ संचालकपदासाठी एकूण ९४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज सादर केले.
त्यापैकी १३ अर्ज छाननीत अवैध ठरले. हिंगणघाट बाजार समितीच्या संचालकपदाच्या १८ जागांसाठी ६४ उमेदवारांनी अर्ज सादर केले. छाननी प्रक्रियेत चौघांचे अर्ज अवैध ठरले. तर सिंदी रेल्वे बाजार समितीच्या संचालकपदाच्या १८ जागांसाठी एकूण ७० इच्छुकांनी अर्ज सादर केले असून छाननीत एकाचा अर्ज अवैध ठरला. समुद्रपूर बाजार समितीच्या संचालकपदाच्या १८ जागांसाठी ४८ उमेदवारांनी अर्ज सादर केले. त्यापैकी दोघांचे अर्ज अवैध ठरले. आष्टी बाजार समितीच्या १८ जागांसाठी ६१, आर्वी बाजार समितीच्या संचालकपदाच्या १८ जागांसाठी ६५ उमेदवारांनी अर्ज सादर केले हाेते. या दोन बाजार समितीत प्रत्येकी दोन अर्ज अवैध ठरले.
छाननीनंतर कुठल्या बाजार समितीत कुठल्या मतदारसंघात किती उमेदवार?
बाजार समिती : सहकारी संस्था मतदारसंघ : ग्रामपंचायतींचा मतदारसंघ : व्यापारी/अडते मतदारसंघ : हमाल/मापारी मतदारसंघ
* पुलगाव : ४८ : २६ : ४ : २
* वर्धा : ४१ : १७ : ७ : ५
* आष्टी : ३५ : १६ : ६ : २
* सिंदी रेल्वे : ३७ : २३ : ७ : २
* आर्वी : ३८ : १६ : ६ : ३
* समुद्रपूर : ३१ : १२ : २ : १
* हिंगणघाट : ३६ : १५ : २ : ७
२१ एप्रिलला मिळणार निवडणूक चिन्ह
बाजार समितींच्या संचालकपदासाठीच्या निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या उमेदवारांना ६ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत आपला अर्ज मागे घेता येणार आहे. निवडणूक रिंगणात कायम असलेल्या उमेदवारांना २१ एप्रिलला निवडणूक चिन्ह वितरित करण्यात येणार आहे.