भाजप निरीक्षकांनी घेतली झाडाझडती; आमदारांशी ‘वन बाय वन’ चर्चा, अंतर्गत कुरघोडी उघड
By रवींद्र चांदेकर | Published: June 22, 2024 04:38 PM2024-06-22T16:38:14+5:302024-06-22T16:40:05+5:30
पराभवाची कारणमीमांसा, पदाधिकाऱ्यांची कानउघडणी.
रवींद्र चांदेकर, वर्धा : लोकसभेत झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी पक्षाने विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यांनी शनिवारी जिल्ह्यातील पक्षाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी ‘वन बाय वन’ चर्चा करून झाडाझडती घेतली. यात पक्षातील अंतर्गत कुरघोडीही उघड झाली.
लोकसभेतील पराभवाची भाजपने गंभीर दखल घेतली आहे. भाजपचे उमेदवार रामदास तडस यांचा शरद पवार गटाच्या नवख्या उमेदवाराने पराभव केला. त्यामुळे हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला. सुमारे वर्षभरापासून बूथ बांधणी करूनही पराभव पत्करावा लागल्याने भाजपाचे अंतर्गत नियोजन कोलमडल्याचे उघड झाले आहे. बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख आणि जिल्हा पदाधिकारी लोकसभेच्या परीक्षेत फेल झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी पक्षाने आमदार प्रवीण दटके यांना जिल्ह्यात पाठविले आहे. आमदार दटके यांनी शनिवारी आर्वी मार्गावरील एका ‘पॅलेस’मध्ये आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी ‘वन बाय वन’ चर्चा करून पराभवाची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
सर्वप्रथम बैठकीत केंद्रात नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार स्थापन झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर आमदार दटके यांनी आमदारांना एक-एक बोलावून चर्चा केली. वर्धेचे आमदार डॉ. पंकज भोयर आणि आर्वीचे दादाराव केचे यांनी त्यांच्यासमोर आपली भूमिका मांडली.
हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार एका अंत्ययात्रेत असल्याने उशिरा पोहोचले होते. आमदारांनी आपापल्यापरीने पराभवाची कारणे सांगितली. त्यानंतर जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून ‘वन बाय वन’ पराभवाची कारणे जाणून घेण्यात आली. यात काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षातील अंतर्गत नियोजनावर बोट ठेवल्याचे सांगितले जाते. पक्ष निरीक्षक आमदार प्रवीण दटके यांनी चर्चेत पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याचे सांगितले जात आहे. निरीक्षक झाडाझडती घेत असताना पक्षातील अंतर्गत कुरघाेडी उघड झाल्याचे सांगितले जाते.
जिल्ह्यात ‘भाजप’चे संघटन मजबूत असताना पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. विशेष म्हणजे, अनेक पदाधिकाऱ्यांच्या गावातच पक्षाच्या उमेदवाराला कमी मते मिळाली. खुद्द जिल्हाध्यक्षांच्या गावातही पक्षाला साजेशी कामगिरी करता आली नाही. अनेक मंडळ प्रमुख, बूथ प्रमुख, शक्ती प्रमुखांच्या गावातही भाजप उमेदवाराला अपेक्षित मते पडली नाही. त्यामुळे पराभव पत्करावा लागला. या सर्वांचा आढावा घेण्यासाठीच निरीक्षक म्हणून आमदार प्रवीण दटके यांना जिल्ह्यात पाठविण्यात आले. त्यानुसार त्यांनी आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याचे सांगितले जाते.
नियोजनशून्यतेचा पक्षाला फटका-
लोकसभा निवडणुकीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि लोकसभा प्रमुख यांच्या नियोजनशून्यतेचा फटका बसला. त्यामुळे उमेदवाराचा पराभव झाल्याचे मत एका आमदारांनी पक्ष निरीक्षकांसमोर मांडल्याची माहिती आहे. त्यांच्या या दाव्याने निरीक्षकही आश्चर्यचकीत झाले. काही पदाधिकाऱ्यांनीही पराभवामागील कारणे सांगताना पक्षातील ‘असमन्वया’चा मुद्दा उपस्थित केल्याचे सांगितले जाते. ही चर्चा ‘वन बाय वन’ असल्याने काही पदाधिकाऱ्यांनी अनेक बाबींवर अचूक ‘बोट’ ठेवले. यातून पक्षात सर्व ‘ऑलवेल’ नसल्याचे स्पष्ट झाले.
हिंगणघाट, आर्वीत मतांचा मोठा खड्डा लोकसभा निवडणुकीत भाजपला हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून मोठी आघाडी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली आहे. या विधानसभा मतदारसंघात भाजप २० हजार ५५ मतांनी माघारला. आर्वीतही भाजप उमेदवार १९ हजार ९५५ मतांनी पिछाडीवर राहिले. भाजप उमेदवाराचा गृह मतदारसंघ असलेल्या देवळीत तर ते चक्क तब्बल ३२ हजार २२ मतांनी माघारले. देवळी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार असल्याने ही बाब गौण समजली जात आहे. केवळ वर्धा विधानसभेत भाजप उमेदवाराच्या मतांमध्ये केवळ नऊ हजार ६६९ मतांचा अल्पसा खड्डा पडला. या सर्व बाबींचा पक्ष निरीक्षकांनी आढावा घेतला. त्यावरून आता पुढील विधानसभेची ‘रणनीती’ आखली जाणार असल्याची माहिती आहे.