वर्ध्यात १७७ 'आपले सरकार सेवा केंद्रा'ला लावले टाळे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 05:20 PM2024-08-06T17:20:58+5:302024-08-06T17:22:45+5:30
कामात अनियमितता भोवली : एकही ट्रान्झेक्शन न झालेल्या आयडी केल्या बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सर्वसामान्यांना विविध दाखल्यांकरिता तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत; त्यांचा वेळ आणि पैसा वाचावा आणि गावागावांतच सेवा उपलब्ध व्हावी, याकरिता शासनाने 'आपले सरकार सेवा केंद्र' सुरू केले होते; परंतु काही केंद्र संचालकांनी या सेवेला हरताळ फासून दुकानदारी चालविल्याचे निदर्शनास येताच प्रशासनाने तपासणी मोहीम आरंभली. तपासणीअंती अनियमितता आढळून आल्याने तिन्ही उपविभागांतील एकूण १७७ 'आपले सरकार सेवा केंद्रां'चे परवाने रद्द करून त्यांना कायमचे टाळे ठोकले आहेत.
जिल्ह्यातील तिन्ही उपविभागांतील आठही तालुक्यांमध्ये शासनाकडून टप्प्याटप्प्यांत ८३० आपले सरकार सेवा केंद्रे सुरू केली होती. या केंद्रांतून विविध प्रमाणपत्रे व दाखले उपलब्ध करून दिले जातात. विशेषतः कोणत्या दाखल्याकरिता किती कालावधी व किती रक्कम आकारली जावी, याचीही नियमावली शासनाकडून ठरवून दिली होती; परंतु बहुतांश आपले सरकार सेवा केंद्र संचालकांनी या केंद्रांच्या माध्यमातून आपली दुकानदारी चालविली होती. अवाच्या सव्वा शुल्क आकारणे, तसेच नियमबाह्य प्रमाणपत्र देण्याचे प्रकारही जिल्ह्यात उघडकीस आले. गेल्यावर्षी या गंभीर बाबी चव्हाट्यावर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तिन्ही उपविभागीय अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकार क्षेत्रातील आपले सरकार सेवा केंद्राची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना सूचना करून तपासणी करण्यात आली. अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र संचालकांची सुनावणी घेतली. त्यानंतर १७७ केंद्रांचे परवाने रद्द केले.
गरिबांचा वेळ, पैसा वाचण्यासाठी निर्मिती
शासनाने जवळपास प्रशासनाच्या सर्व सुविधा ऑनलाइन केली आहे. यात जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासह लहान-मोठ्या कामासाठी उपयोगात येणाऱ्या सर्व कागदपत्रांचा समावेश आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची गरज राहिली नाही. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होते आहे.
या सुविधा देणे अपेक्षित
आपले सेवा केंद्र सुरू करण्यात आल्यानंतर सर्वसामान्यांना उत्पन्नाचा दाखला, अधिवास, शपथपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र, अकृषक परवाना, वारस प्रमाणपत्र, वंशावळ प्रमाणत्र देणे अपेक्षित आहे.
तालुकानिहाय केंद्र
उपविभाग केंद्रांची संख्या
वर्धा ७४
आर्वी २८
हिंगणघाट ७५
रद्द केलेले परवाने
तालुका केंद्र रद्द केलेले केंद्र
आर्वी ७९ १३
आष्टी ४९ ०२
कारंजा ५२ १३
देवळी १०६ १७
सेलू १०१ २७
वर्धा १९८ ३०
हिंगणघाट १४३ ३४
समुद्रपूर १०२ ४१
"जिल्ह्यात ज्या आपले सरकार केंद्र संचालकांनी आयडी घेतल्यापासून एकही ट्रान्झेक्शन केलेले नाही अशा १७७ केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले
आहेत. यामुळे नवीन केंद्र संचालकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे."
- राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, वर्धा.
आयडी घेतल्यापासून एकही ट्रॅन्झक्शन नाही; परवाना रद्द
आयडी घेतल्यापासून एकही ट्रान्झेक्शन नाही गावातील नागरिकांना प्रशाकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने ८३० केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र, यातील तब्बल १७७ आपले सेवा केंद्राच्या आयडीवरून एकही ट्रान्झेक्शन झाले नसल्याने या आयडी बंद करण्यात आल्या आहेत.