निम्न वर्धा प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत धरणे
By admin | Published: January 19, 2016 03:25 AM2016-01-19T03:25:48+5:302016-01-19T03:25:48+5:30
निम्न वर्धा प्रकल्पामुळे बाधित नेरीचे सालोड (हि.) येथे पुनर्वसन झाले; पण अद्यापही नागरी सुविधा पुरविल्या नाही. नेरी
वर्धा : निम्न वर्धा प्रकल्पामुळे बाधित नेरीचे सालोड (हि.) येथे पुनर्वसन झाले; पण अद्यापही नागरी सुविधा पुरविल्या नाही. नेरी पुनर्वसन येथे रस्ते, वीज, पाणी या सुविधा नाही. या समस्या दूर करण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.
नेरी पुनर्वसन येथील प्लॉटवर कच्ची घरे बांधून देण्यात आली. त्यांची दुरवस्था झाली आहे. विजेचे खांब आहे; पण पथदिवे नाही. यामुळे रात्री बाहेर निघणे कठीण होते. सर्पदंशाच्या अनेक घटना येथे घडल्या आहेत. सदर वसाहतीत पुनर्वसन विभागाने बांधलेले रस्ते पुर्णत: उखडले आहे. बांधलेले पूल खचले. रस्त्यांचे बांधकामही निकृष्ट दर्जाचे होते. पाण्यासाठी टाकी बांधली; पण वापरापूर्वीच त्या टाकीला तडे गेले. पाणी पुरवठ्याच्या विहिरीवरील मोटरपंप नादुरूस्त असून पाईपलाईन सदोष व निकृष्ट असल्याने जागोजागी फुटली आहे. परिणामी आठ दिवसांतून एकदा पाणी मिळते. जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना अल्प मोबदला दिला. पर्यायी जमिनीसाठी शेतकऱ्यांनी ३० ते ८० हजार रुपये २००६ मध्ये जमा केले; पण जमीन मिळाली नाही. शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. नेरी पुनर्वसन येथील या समस्या दूर कराव्या, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.