भगवान महावीर जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रम
By admin | Published: April 10, 2017 01:30 AM2017-04-10T01:30:53+5:302017-04-10T01:30:53+5:30
समस्त जैन समाजाद्वारे २४ वे जैन तीर्थकर युग प्रवर्तक, अहिंसेचे प्रणेता १००८ श्री. भगवान महावीर स्वामींचा २६१६ वा जन्म ...
शोभायात्रेतील चांदीचे दोन रथ ठरले आकर्षण : दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल
वर्धा : समस्त जैन समाजाद्वारे २४ वे जैन तीर्थकर युग प्रवर्तक, अहिंसेचे प्रणेता १००८ श्री. भगवान महावीर स्वामींचा २६१६ वा जन्म कल्याणक महोत्सव रविवारी उत्साहात साजरा झाला. या महोत्सवादरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महावीर जयंतीनिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी जैन श्वेतांबर विश्वप्रभू मंदिर तीर्थ येथून एका मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत जैन समाजबांधव मोठ्या संख्य्येने सहभागी झाले होते. जैन श्वेतांबर विश्वप्रभू मंदिरातून निघालेली शोभायात्रा सुपार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात पोहोचली. येथून ही यात्रा बाजार परिसरात भ्रमंती करून मुख्या मार्गाने महावीर उद्यानाकडे निघाली. या यात्रेत जैन बांधव ओढत असलेले सजविलेले चांदीचे दोन रथ आकर्षणाचे केंद्र ठरले. आकर्षक बॅण्ड पथक, सजविलेल्या विविध झाक्या, लक्ष वेधत होत्या. यात्रेत सहभागींकरिता समाज बांधवांच्यावतीने प्रत्येक रस्त्यावर सरबत व पाण्याची व्यवस्था केली होती.
शहरातील मुख्य मार्गाने भ्रमंती करीत ही यात्रा स्वाध्याय मंदिरात पोहोचली. येथे अतिथींच्या हस्ते महावीर उद्यानातील किर्ती स्तंभाची पूजा करण्यात आली. यावेळी भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय सचिव संजय सिंघी यांची प्रमुख उपस्थिती होती तर पुजेच्यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष तथा श्री जैन श्वेतांबर चंद्रप्रभू मंदिराचे अध्यक्ष यागेंद्र फत्तेपुरीया वर्धमान श्वेतांबर स्थानक भवनाचे अध्यक्ष रूपचंद बोथरा, सुपार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष अभिजीत श्रावणे, श्री महावीर दिगंबर जैन मंदिर रामनगरचे अध्यक्ष सुनील मांडवगडे, नवखंड पद्मावती माता मंदिराचे अध्यक्ष विनायक भुसारी, अनेकांत स्वाध्याय मंदिर तथा सन्मती नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष महाविर पाटणी व भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष मणोज श्रावणे यांच्यासह समाजातील नागरिक उपथिस्त होते.
किर्ती स्तंभाच्या पुजनानंतर स्वाध्याय मंदिरात कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय सिंघी होते. कार्यक्रमादरम्यान पाळणा झुलवून महावीरांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानंतर रतलाम येथील मनीष मेहता व महिला मंडळाच्यावतीने भगवान महावीर यांची स्रान व पुजा झाली. यावेळी नरेंद्र जोशी यांनी मंगलाचरण सादर केले. या कार्यक्रमला प्रमुख मार्गदर्शक म्हणून नगराध्यक्ष अतुल तराळे होते. यावेळी मार्गदर्शन करताना तराळे यांनी वर्धा शहर प्लास्टिक मुक्त करण्याचे आवाह करीत पालिकेच्या स्वच्छता मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक योगेंद्र फतेपुरीया यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री जैन श्वेतांबर चंद्रप्रभू मंदिराचे सचिव चंद्रेश मांडवीया यांनी मानले. यावेळी झालेल्या सर्वच कार्यक्रमांत जैन समाजबांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते. (प्रतिनिधी)