बौद्ध धम्म परिषदेचे थाटात उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:55 PM2017-12-02T23:55:08+5:302017-12-02T23:56:07+5:30
येथील डॉ. आत्मारामजी उपाख्य बाबूजी जवादे स्मृती परिसरामध्ये द्विदिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी उद्घाटनपर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात धम्मध्वज ध्वजारोहण व बुद्ध वंदना भदंत सत्यानंद महाथेरो येणाळा, अरण्यवास यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथील डॉ. आत्मारामजी उपाख्य बाबूजी जवादे स्मृती परिसरामध्ये द्विदिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी उद्घाटनपर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात धम्मध्वज ध्वजारोहण व बुद्ध वंदना भदंत सत्यानंद महाथेरो येणाळा, अरण्यवास यांच्या हस्ते करण्यात आले.
व्यासपीठावर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक आंबेडकर, माजी उपजिल्हाधिकारी अशोक गेडाम, शिक्षण महर्षी जयानंद खडसे, प्राचार्य आर. के. पाटील, उपप्राचार्य गुडधे, पर्यवेक्षक दिनेश वाघ, सुधीर राऊत, बन्सोड, देवतळे, रुईकर आदींची उपस्थिती होती.
त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शहरातील पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी बुद्धवंदना व नृत्य सादर केले. धम्म परिषदेचे उद्घाटन अनिल जवादे यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत माजी प्राचार्य गोरख भगत यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम गोरख भगत यांनी दैनंदिन जीवनातील अनुभव सांगितले. तसेच डॉ. आंबेडकर यांच्या विचारातून स्थापन केलेल्या समता सैनिक दल, आरपीआयची आजची दिशा आणि दशा या विषयावर माहिती दिली.
मार्गदर्शन करताना अनिल जवादे यांनी डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध दिक्षा घेतलेल्या नागपूरच्या दीक्षा भूमीला बौध्द धम्मपिठ स्थापनेत बौद्ध संघाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमातील विशेष अतिथी सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी बौद्धधम्मा पुढील आव्हाने यावर माहिती दिली. शिवाय पंचशीलाचे आचरण करावे स्पष्ट केले. प्राचार्य शेंडे यांनी एकविसाव्या शतकात संपूर्ण भारत बौद्ध मय होईल, असे सांगितले. सत्कारमूर्ती राजरत्न आंबेडकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, आम्ही दलित व नवबौद्ध नसून आम्ही केवळ बौद्ध आहोत, असे सांगत विषयाला अनुसरून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत आनंद महाथेरो (आग्रा) यांनी राजकीय पक्ष स्वार्थासाठी बौद्ध बांधवांचा कसा वापर करतात हे स्पष्ट केले. सांकृतिक कार्यक्रमाने धम्म परिषदेच्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला. या धम्म परिषदेला शहरासह परिसरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिषदेचा समारोप रविवारी होणार आहे.