हा युद्धाचा प्रसंग; भयही गेलं, बहुतांश वेळ स्मशानातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 05:00 AM2021-04-30T05:00:00+5:302021-04-30T05:00:11+5:30

कमी-अधिक फरकाने सर्व कर्मचाऱ्यांचा असाच अनुभव असून, कुटुंबापासून दूर राहून त्यांना अंत्यविधी पार पाडावे लागत आहेत. सध्या कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या आकड्यांसोबतच कोरोनामुळे मृत होण्याचे प्रमाणही वाढले आहेत. बुधवारी तब्बल ३४ मृतदेहांवर अंत्यविधी करण्यात आला. दररोजही किमान १० ते १५ जणांचा मृत्यू अलीकडे होत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह नातेवाइकांना दिला जात नाही.

This is an incident of war; Fear is gone, most of the time in the cemetery! | हा युद्धाचा प्रसंग; भयही गेलं, बहुतांश वेळ स्मशानातच!

हा युद्धाचा प्रसंग; भयही गेलं, बहुतांश वेळ स्मशानातच!

googlenewsNext
ठळक मुद्देनगरपालिकेच्या सहा, तर सावंगीच्या आठ कर्मचाऱ्यांकडून अंत्यविधीचे धाडस : शेवट पाहून नातेवाइकांनाही अश्रू आवरेना

चैतन्य जाेशी
लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा : दिवसातला अधिक वेळ आता स्मशानात जात आहे... सुरुवातीला भीती वाटत होती... पण आता भीतीदेखील मेली आहे... एक कर्तव्य म्हणून कोरोनाग्रस्तांवर अंत्यविधी पार पाडण्याचे काम आम्ही करीत आहोत... असा अंगावर शहारे आणणारा अनुभव नगरपालिकेचे कर्मचारी आणि सावंगी (मेघे) येथील कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’कडे विशद केला. 
कमी-अधिक फरकाने सर्व कर्मचाऱ्यांचा असाच अनुभव असून, कुटुंबापासून दूर राहून त्यांना अंत्यविधी पार पाडावे लागत आहेत. सध्या कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या आकड्यांसोबतच कोरोनामुळे मृत होण्याचे प्रमाणही वाढले आहेत. बुधवारी तब्बल ३४ मृतदेहांवर अंत्यविधी करण्यात आला. दररोजही किमान १० ते १५ जणांचा मृत्यू अलीकडे होत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह नातेवाइकांना दिला जात नाही. सुरुवातीपासूनच अंत्यविधी नगरपालिकेकडून आणि कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांकडून पार पाडला जात आहे. वर्धा येथील स्मशानभूमीत दररोज कोरोनाग्रस्तांच्या चिता धगधगत आहेत. येथे अन्य ठिकाणापेक्षा अधिक ताण आहे. बहुतांश रुग्ण जिल्हा सामान्य तसेच सावंगी मेघे येथील रुग्णालयात मृत पावत आहेत. अशा सर्वांवरच अंत्यविधीसाठी करण्यात येणाऱ्या तयारीची जबाबदारी नगरपालिकेच्या सहा कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यांच्याकडून अविरत हे कार्य सुरू आहे. यामध्ये समीर नगराळे, ईश्वर, दादाराव जाधव, महेश नकले, सचिन नराते, अश्विन खंडाते हे लाकडे जमा करणे, सरण रचणे, दाह शेडची साफसफाई करणे, राख गोळा करणे आदी कामे करीत आहेत. अशी विदारक परिस्थिती पाहून अंगावर शहारे येत असून, आता आमच्यातील भीतीदेखील मेली असल्याचे न.प. कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
 

रक्ताच्या नातेवाईकांचाही नकार
अनेक कोरोनाग्रस्तांचे नातेवाईक बहुतांश वेळी अनास्थेने वागत असतात. दगावल्यानंतर पुढील सोपस्कार पार पाडण्यासाठी तीन ते चार दिवस येतही नाहीत. अशावेळी धोका पत्कारूनच कर्मचारी अंत्यविधीचे काम करतात.नातेवाईक उपस्थित असतात. मात्र, त्यांच्याकडून तुम्हीच अंत्यविधी करा, आम्ही हातही लावणार नाही, असे सांगण्यात येते. कोरोनाने नात्यातला ओलावा आटल्याची प्रचिती येत आहे.

कर्तव्य बजावणे हाच उद्देश... 
प्रशासनाने अंत्यविधी करण्याची जबाबदारी आम्हा कर्मचाऱ्यांवर टाकली आहे. ही जबाबदारी निष्ठेने पार पाडण्याचे काम आम्ही करत आहे. अनेक बरेवाईट अनुभव येत आहेत. तसेच यावेळी त्रासही सहन करावा लागत आहे. मात्र, कौटुंबिक व सामाजिक कारणे दूर टाकून कर्तव्य बजावण्याचा उद्देश प्रामाणिकपणे आम्ही पार पाडत असल्याचे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

काहींना अश्रूंचे बांध अनावर 
एकीकडे आपल्याच नातेवाइकांच्या मृतदेहासोबत अनास्थेने वागणारे नातलग असतात, तर दुसरीकडे काही नातेवाइकांना गहिवरून येते. आपल्या आप्तेष्टाचा विचित्र पद्धतीने होत असलेला शेवट पाहून त्यांच्या अश्रूंचा बांध फुटतो. 
कुटुंबापासून दूर वास्तव्य...
दररोज कोरोनाग्रस्तांवर अंत्यविधी करण्याचे कार्य पार पाडावे लागते.त्यावेळी पीपीई कीट घालून तसेच संपूर्ण सुरक्षेची काळजी घेऊनच काम करावे लागते.त्यामुळे कुटुंबापासूनही दूर राहावे लागते.अशा परिस्थितीत त्यांना कुटुंबाची काळजी घेण्यासाठीही दक्षता घ्यावी लागते.

४०० वर मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार 

सावंगी येथील रुग्णालयातील आठ कर्मचाऱ्यांची चमू कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यविधी पार पाडण्याचे काम करीत आहे. गत दीड वर्षांपासून राजेश ढोक, चेतन वानखेडे, योगेश चुन्ने, समीर उमाटे, आरती मारगाये, संदीप मुडे, इरफान पठाण, विजय महापुरे यांनी वर्धा येथील मोक्षधामात तब्बल ४०० वर कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार पार पाडल्याचे सांगितले. तब्बल आठ ते नऊ तास आम्ही स्मशानात राहतो. काम आटोपल्यावर रुग्णालयात पीपीई किट काढून ठेवत आंघोळ करूनच घरी जातो. घरी गेल्यावरही कपडे बाजूला ठेवून पुन्हा आंघोळ करून मग घरात प्रवेश करतो. दररोज मृतदेहांसोबतचा प्रवास पाहून आमच्या मनातील भीती आता निघालेली आहे. पण,  कुटुंबाची चिंता भेडसावते. आम्ही सुरक्षित, तर कुटुंब सुरक्षित राहील, असेही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

 

Web Title: This is an incident of war; Fear is gone, most of the time in the cemetery!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.