जलयुक्त शिवार अभियानात कार्यक्षमता वाढवा
By admin | Published: May 30, 2015 12:18 AM2015-05-30T00:18:52+5:302015-05-30T00:18:52+5:30
शेतकऱ्यांच्या हिताचा प्राधान्याने विचार करून शासनाच्या महत्त्वपूर्ण अशा जलयुक्त शिवार अभियानातील कामे प्रभावीपणे,
सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचना : संकेतस्थळावर सर्व कामांची छायाचित्रे टाका
श्रीकृष्ण जिनिंगमध्ये अडकलेली रक्कम काढण्याकरिता पालकमंत्र्यांना साकडे
वर्धा : शेतकऱ्यांच्या हिताचा प्राधान्याने विचार करून शासनाच्या महत्त्वपूर्ण अशा जलयुक्त शिवार अभियानातील कामे प्रभावीपणे, गुणवत्तापूर्ण ३० जूनपूर्वी पूर्ण करावीत. य कामात पारदर्शकता राबवित कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना वित्त व नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना दिल्यात.
विकास भवन येथे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठक झाली. यावेळी खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने, जलयुक्त शिवार अभियानाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संजय भागवत, सहअध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना, सदस्य सचिव भाऊसाहेब बऱ्हाटे व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानामध्ये लोकांचा सहभाग वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत होत असलेल्या कामांबाबतचा आढावा, सुरू असलेल्या कामांची यादी उपलब्ध करून द्यावी. आठवड्यातून किमान पाच कामांची लोकप्रतिनिधींसह पाहणी करावी. कामांचा कार्यारंभ आदेशाची प्रतही लोकप्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यात यावी. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींची जलयुक्त शिवार अभियानाबाबत विस्तृत बैठक, कार्यशाळाही लवकरात लवकर घेण्यात यावी. अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती लोकप्रतिनिधींसह, कंत्राटदार, ग्रामपंचायतस्तरापर्यंत पोहोचविण्यात यावी. त्याचबरोबर अभियान यशस्वीतेसाठी अधिकारी, कंत्राटदारांनी पारदर्शकपणे कामे करावीत. वेळेत कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅक लिस्ट करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
अभियानांतर्गत करण्यात येत असलेल्या कामांबाबत किमान सात दिवसांच्या आत, तातडीने निर्णय घ्यावा. अभियानातील कामांच्या व्यवस्थापनाकरिता स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. ज्या विभागांच्या कामाचा वेग कमी आहे, त्यांनी वेळेत लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून कामे पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूना त्यांनी केल्या. पूर्ण झालेल्या सर्व कामांचे छायाचित्र जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यासंदर्भातही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्यात. जिल्ह्यातील कृषी, लघुसिंचन, जलसंधारण, वन आदी विभागांच्या प्रमुखांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेली कामे दिलेल्या तारखेपूर्वी पूर्ण करण्याची ग्वाही ना. मुनगंटीवार यांना दिली.
प्रारंभी जिल्हाधिकारी संजय भागवत, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना यांनी जिल्ह्यातील अभियानाबाबात सविस्तर माहिती पालकमंत्र्यांना दिली. बैठकीचे प्रास्ताविक करीत बऱ्हाटे यांनी पॉवरपॉर्इंटद्वारे अभियानाची संपूर्ण माहिती दिली.(प्रतिनिधी)
सेलू तालूक्यातील श्रीकृष्ण जिनिंग प्रेसिंगमध्ये शेतकऱ्यांचा कापूस अनामत ठेवून भाव देण्याची प्रथा गत दहा ते बारा वर्षांपासून जिनिंगचे संचालक सुनील टालाटुले यांनी सुरू केली. यामुळे सेलू तालुक्यातील अनेक शेतकरी त्यांचा कापूस अनामत टाकत होते. त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून या वर्षी २०१४ ते १५ मध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा कापूस अनामत म्हणून घेतला व मार्च नंतर पैसे देण्यात येईल असे सांगितले. शेतकऱ्यांनी दिलेल्या तारखेनंतर पैशाची मागणी केली असता टाळाटाळ करणे सुरू केले. अखेर त्याने शेतकऱ्यांना मी पैसे देऊ शकत नाही म्हणत हात वर केले. सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचे या जिनिंगमध्ये सुमारे दहा कोटी रुपये थकले आहे. यामुळे टालाटुलेवर रितसर कारवाई करून सरकारद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे पैसे मिळवून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी सेलू तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना केली आहे. यावर मार्ग काढण्याचे आश्वासन मिळालेल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.