गाव नाल्यावरील पुलाची उंची वाढवा
By Admin | Published: May 23, 2017 01:08 AM2017-05-23T01:08:03+5:302017-05-23T01:08:03+5:30
हमदापूर येथील गाव नाल्यावरील पूल ठेंगणा आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष : पावसाळ्यापूर्वी काम करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : हमदापूर येथील गाव नाल्यावरील पूल ठेंगणा आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत आहे. मात्र ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबीत असून येथील नागरिकांना पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. येथील ग्रामपंचायतने प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला मात्र येथील पुलाची उंची वाढविण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही.
पावसाळा सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असताना अद्याप या मागणीकडे प्रशासन गांभिर्याने लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे. सेवाग्राम-कांढळी या मार्गावर हमदापूर हे गाव आहे. येथे आठवडी बाजार, शाळा, अधिकोष, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी सुविधा असून परिसरातील २२ येथे गावे येथे जोडली आहे. या गावांचा हमदापूर येथे नियमीत संपर्क येतो. मुख्य मार्गावर हा पूल असल्याने कामानिमित्त आलेल्या नागरिकांना ये-जा करण्यास अडचणीचे ठरते.
हमदादपूर गावात जाण्यासाठी नाला ओलांडून जावे लागते. या नाल्यावर ढोल्यांचा वापर करुन त्यावेळी पूल बांधण्यात आला. मात्र उंची कमी असल्याने पावसाळ्यात या नाल्याला कायम पूर असतो. पाणी पुलावरुन वाहते. अशावेळी आवागमन करणे कठीण होते. त्यामुळे ग्रामस्थांना देर्डा चौकातील रस्त्याने जावे लागते. हा मार्ग जास्त अंतराचा आहे. अल्पशा पावसानंतर पुलावरुन पाणी वाहते. त्यामुळे पूर ओसरेपर्यंत ग्रामस्थांना प्रतीक्षा करावी लागते.
येथील नाल्याचे खोलीकरण करण्यात येत असून संरक्षण भिंतीचे काम सुरू केले आहे. यासोबत पुलाची उंची वाढविण्याचे काम करण्याची मागणी ग्रामस्थांची आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी बांधकामाला प्रारंभ केल्यास ग्रामस्थांना दिलासा मिळेल. समस्येचे स्वरुप पाहता या मागणीकडे लक्ष देणे गरजेचे ठरत आहे.