‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवा
By admin | Published: March 13, 2016 02:32 AM2016-03-13T02:32:38+5:302016-03-13T02:32:38+5:30
दुष्काळावर मात करण्यासाठी तसेच कोरडवाहू शेतीसाठी शासनाने मागेल त्याला शेततळे योजना सुरू केली आहे.
अनुपकुमार : चित्ररथाद्वारे शेततळे व सौर कृषिपंप योजनांची माहिती
वर्धा : दुष्काळावर मात करण्यासाठी तसेच कोरडवाहू शेतीसाठी शासनाने मागेल त्याला शेततळे योजना सुरू केली आहे. या योजनेत प्रत्येक शेतकऱ्याने सहभागी व्हा. तसेच सौर कृषिपंपाच्या माध्यमातून शेती सिंचनाखाली आणणाऱ्या महत्त्वकांशी योजना चित्ररथाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवा, असे आवाहन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषिपंप योजनेत तसेच मागेल त्याला शेततळे या योजनांच्या प्रसिद्धी चित्ररथाला विभागीय आयुक्त अनूपकुमार यांनी हिरवी झेंडी दाखविली. जिल्ह्यातील आठही तालुक्यात १० दिवस चित्ररथाच्या माध्यमातून योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलील, अपर जिल्हाधिकारी दीपक नलावडे, कृषी उपसंचालक कापसे, यासह महसूल अधिकारी उपस्थित होते.
मागेल त्याला शेततळे ही योजना शेतीमध्ये शाश्वत सिंचनासाठी व दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्याने ही योजना राबविण्याचे धोरण ठरविले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याने या योजनेत सहभागी होऊन आपली नाव नोंदवावी, असे आवाहन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी यावेळी केले. शेततळे योजना राबविण्यासाठी शासनाने ५० हजार रुपयापर्यंतचे अनुदान उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने शेततळ्याची मागणी नोंदवावी, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
त्याचप्रकारे जिल्ह्यासाठी सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ९२० शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. लाभार्थ्यांना केवळ पाच टक्के रक्कम भरावयाची असल्यामुळे ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची आहे. कृषी पंपाच्या माध्यमातून आपली शेती सिंचनाखाली आणावी असे आवाहनही विभागीय आयुक्तांनी केले.
जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी सौर कृषिपंप योजनेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढत असून सुमारे ५०० शेतकऱ्यांनी आतापर्यंत नाव नोंदविल्याचे सांगितले. जिल्ह्यात ९२० शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ
द्यायचा आहे. वीजकनेक्शन नसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने या योजनेत सहभागी व्हावे असेहे ते म्हणाले. मागेल त्याला शेततळे योजनेमध्ये जिल्ह्यात २ हजार २४ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आहे. शेतकऱ्यांनी शेततळे बांधण्याची योजना यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे नाव नोंदवावयाचे आहे. मागेल त्याला शेततळे योजनेसाठी प्रत्येक तालुक्यात विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना या योजनेच्या माहितीसाठी विहित नमुन्यात अर्ज भरून घेण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी सौर कृषी पंप योजना आणि मागेल त्याला शेततळे या योजनेसंदर्भात प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाची माहिती दिली. चित्ररथ १३ मार्च रोजी हिंगणघाट तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन या योजनांची जनतेला माहिती देणारे आहे.
विभागात देवळी तालुक्यात १४ मार्च, पुलगाव तालुक्यात १५ मार्च, आर्वी तालुक्यात १६, आष्टी तालुक्यात १७ मार्च, कारंजा तालुक्यात १८ मार्च, सिंदी रेल्वे १९ मार्च, सेलू तालुक्यात २० मार्च आणि वर्धा येथे या चित्ररथाचा समारोप होणार आहे. (शहर प्रतिनिधी)