तलाव तेथे मासोळी अभियानातून अर्थाेत्पादनात वाढ करा
By admin | Published: June 4, 2017 01:00 AM2017-06-04T01:00:14+5:302017-06-04T01:00:14+5:30
पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात तलाव आहे. या तलावांचा पाहिजे त्या प्रमाणात अद्याप उपयोग घेण्यात आला नाही.
अनुप कुमार : लाल नाला येथे मोहिमेचा शुभारंभ; राज्यातील ३६ टक्के मत्स्योत्पादन पूर्व विदर्भातून
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात तलाव आहे. या तलावांचा पाहिजे त्या प्रमाणात अद्याप उपयोग घेण्यात आला नाही. पूर्व विदर्भातील ४ लाख ७० हजार लोकांची उपजीविका मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहे. मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी मासेमारी करणाऱ्या ढिवर बांधवांसह शेतकऱ्यांनी तलाव तेथे मासोळी अभियानात सहभागी होत अर्थाेत्पादनात वाढ करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी केले.
समुद्रपूर येथील लाल नाला प्रकल्पस्थळी तलाव तेथे मासोळी अभियानाचा शुभारंभ अनुप कुमार यांनी केला. यावेळी ते बोलत होते. जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, आ. समीर कुणावार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, मत्स्य व्यवसाय विकास विभागाचे उपायुक्त समीर परवेज, उपविभागीय अधिकारी समाधान शेंडे उपस्थित होते.
अनुप कुमार पुढे म्हणाले की, या अभियानाचे स्वप्न मागील तीन वर्षांपासून बघत होतो. त्याची आज सुरुवात झाली आहे. ढिवर समाज बांधव पारंपरिक पद्धतीने मासेमारी करतो; पण त्याच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसत नाही. राज्याचे ३६ टक्के मत्स्योत्पादन पूर्व विदर्भातून होते. एवढी मोठी उत्पादन क्षमता असताना गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनाकडे दुर्लक्ष झाले आहे. पारंपरिक पद्धतीतून मत्स्योत्पादन कमी होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड असल्याशिवाय उत्पन्नात वाढ होणार नाही. लोकअभियान म्हणून तलाव तेथे मासोळी हे अभियान पूढे आले पाहिजे. जलयुक्त शिवार अभियानात ५० कोटी वृक्ष लागवड मोहीम यशस्वी होत आहे, त्याचप्रमाणे हे अभियानही यशस्वी होईल. पूर्व विदर्भात मत्स्य विकासाच्या दृष्टीने २०२२ चा आराखडा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांना तयार करण्यास सांगितले आहे. या अभियानासाठी अनुकूल तलावांची निवड करून जूनमध्ये मत्स्य संवर्धनाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मत्स्य विकास हा केवळ उत्पन्नात वाढ व उपजिविकेचे साधन नाही. मास्यांमध्ये प्रथिनांचा मोठा स्त्रोत असल्याने त्याचा उपयोग शरीराच्या वाढीसाठी होईल. मासे खाण्यामुळे मेंदू विकासास चालना मिळते. सर्वाधिक प्रथिने मास्यांमध्ये आहे. अन्न साखळीमध्ये प्रथिनाला महत्त्व आहे. आश्रमशाळांतूनही मुलांना आहारात मासे द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
आ. कुणावार यांनी या अभियानामुळे शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यास मदत होईल. शेतकऱ्यांना जोडधंद्याची गरज आहे. योजना हा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाची भूमिका महत्त्वाची आहे. या योजनेतून मागेल त्याला शेततळे प्रमाणे मागेल त्याला मत्स्य बोटुकली द्यावे. मत्स्योत्पादनासाठी तलावांचा लिलाव होतो, त्याचा फायदा जिल्ह्याबाहेरील लोक घेतात. या योजनेचा फायदा स्थानिक ढिवर समाजाला देण्यासाठी स्थानिकांना प्राधान्य द्यावे, असे सांगितले.