जिल्ह्यात अल्पवयीन गुन्हेगारांच्या संख्येत वाढ; शंभरावर अल्पवयीन ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 03:41 PM2021-11-21T15:41:32+5:302021-11-21T15:50:30+5:30
१४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचा बलात्कार, विनयभंग, चोरी, घरफोडी, लूटमार आणि शस्त्राचा वापर अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग दिसतो.
वर्धा : जिल्ह्यात गुन्हेगारी जरी नियंत्रित असली तरी अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते आहे. १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचा बलात्कार, विनयभंग, चोरी, घरफोडी, लूटमार आणि शस्त्राचा वापर अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग दिसतो. अल्पवयीन मुलांना कायद्याचे संरक्षण असल्याने त्यांना अटक करता येत नाही. शिक्षा होणार नाही, असे सांगून गुन्हेगार त्यांच्याकडून गुन्हे करवून घेतात. त्यामुळे अल्पवयीन गुन्हेगार सध्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील झोपडपट्टी परिसरात बाल गुन्हेगारांचे प्रमाण जास्त आहे. विभक्त कुटुंब आणि आईवडिलांना असलेले दारू, अमली पदार्थांचे व्यसन यांचा परिणाम मुलांवर होतो. संस्कारांचा अभाव आणि वाईट संगतीमुळे अनेक मुले वाममार्गाला लागत आहेत. काही केवळ शौक म्हणून चोरी, घरफोडी तसेच दुचाकी चोरण्यासारखे गुन्हे करीत असल्याने अनेकदा उघडकीस आले आहे.
व्यसनाची पूर्तता करण्यासाठी किंवा मोबाईल, कपडे, घड्याळ, बाईक किंवा अन्य चैनीच्या वस्तू मिळविण्यासाठी मुले चोरी करण्यास धजावतात. गुन्ह्याच्या चौकशीदरम्यान अशा मुलांना ताब्यात घेतल्यानंतर पालकांना बोलावून घ्यावे लागते. अशा मुलांना बाल न्यायमंडळासमोर हजर केले जाते. १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांचा विधिसंघर्षग्रस्त बालक असा उल्लेख केला जातो. त्यांना कायद्याने मोठे संरक्षण दिले असल्याने याचाच फायदा गुन्हेगार घेत असून त्यांच्याकडून गुन्हे करवून घेत असल्याचे अनेकदा पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
०८ : खून, खुनाचा प्रयत्न
जिल्ह्यात घडलेल्या खुनाच्या घटना आणि खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटनेत अल्पवयीनांचा समावेश असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले होते. त्यामुळे पालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
२५ : हाणामारी
जिल्ह्यात दरदिवसाआड हाणामारीच्या घटना घडत आहेत. यामध्ये सुमारे २५ प्रकरणांत पोलिसांनी अल्पवयीनांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मात्र, त्यांचे वय कमी असल्याने त्यांना कायद्याचे संरक्षण मिळते.
२२ : विनयभंग
जिल्ह्यात विनयभंगाच्या घटनाही दररोज घडत असल्याचे पोलीस नोंदीवरून दिसून येते. यामध्ये देखील अल्पवयीनांकडून हे गुन्हे केल्या जात असल्याने पोलीस त्यांना ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर करुन त्यांच्या स्वाधीन करतात.
४२ : चोरी, घरफोडी
जिल्ह्यात सध्या दुचाकी चोरींसह, मोबाईल, घरफोडी, चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांनी अनेक गुन्ह्यांचा उलगडा केला असून अनेक प्रकरणात अल्पवयीन मुलांकडून अशा घटना झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
मोबाईल, टीव्ही आणि कौटुंबिक वातावरण
अल्पवयीन मुले मोबाईल आणि टीव्हीच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे महागडे शौक करण्याच्या नादात अनेक अल्पवयीन मुलांकडून विविध गंभीर गुन्हे केल्या जाते. त्यातच कौटुुंबिक कलहातून अनेक मुले वाममार्गाकडे जाण्याचे पाऊल टाकत असल्याने पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
समिती करते अभ्यास...
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत अल्पवयीन मुलांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी काळजी व संरक्षण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे सचिव म्हणून जिल्हा कामगार अधिकारी काम करतात. तसेच महिला व बालकल्याण समितीकडूनही लक्ष दिले जात असून समितीकडून अशा घटनांचा अभ्यास केल्या जातो. त्यानंतर अल्पवयीनांना बाल न्यायमंडळासमोर हजर केले जाते.