पूरक पोषण आहार पुरवठ्याच्या दरात वाढ करा
By admin | Published: July 14, 2017 01:30 AM2017-07-14T01:30:36+5:302017-07-14T01:30:36+5:30
सध्याच्या महागाईच्या काळात पूरक पोषण आहार पुरवठ्याचा दर अत्यल्प आहे. परिणामी, महिला बचत गटांना परवडेनासे झाले आहे.
बचत गटांची मागणी : माजी आमदारांना साकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : सध्याच्या महागाईच्या काळात पूरक पोषण आहार पुरवठ्याचा दर अत्यल्प आहे. परिणामी, महिला बचत गटांना परवडेनासे झाले आहे. यामुळे पोषण आहार पुरवठ्याचे दर वाढवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत सहा बचत गटातील महिलांनी माजी आमदार दादाराव केचे यांना निवेदन देत साकडे घातले.
जिल्हातील महिला बचत गटाद्वारे २००६ पासून एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रांत ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुले, किशोरवयीन मुली, गरोदर माता आदींना पूरक पोषण आहार पुरविण्याचे काम सुरू आहे. सर्व लाभार्थ्यांना कमी दरात पूरक पोषण आहार पुरवठा केला जातो. यामुळे याचे ई-टेंडरिंग न करता हे काम महिला बचत गटांकडे ठेवावे. ३० जून २०१७ च्या पूढे मुदतवाढीस मान्यता देण्यात यावी. महिला बचत गटातर्फे अंगणवाडीत पूरक पोषण आहाराला प्रती लाभार्थी ४.९२ रुपयांप्रमाणे अत्यल्प मोबदला दिला जातो. तो वाढवून किमान १५ रुपये किमान करण्यात यावा. शहरी प्रकल्पातील महिला बचत गटांना सप्टेंबर २०१६ पासूनचा मोबदला देण्यात आला नाही. तो त्वरित द्यावा. अंगणवाडीमध्ये महिला बचत गटातर्फे १ जुलै २०१७ पासून पूरक पोषण आहार पुरवठा सुरू असताना धान्य पुरवठा करण्यात आला नाही. यामुळे धान्य पुरवठा त्वरित करावा. पोषण आहार बंद न करता नेहमीकरिता महिला बचत गटाद्वारे सुरू ठेवावा आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावर केचे यांनी मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन महिला बचत गटाच्या समस्या निकाली काढण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी जिजाऊ, रिद्धी-सिद्धी, श्रीकृष्ण, नवदूर्गा, स्मृती, माहुली आदी बचत गटातील पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.