शबरी आवास योजनेच्या लक्ष्यांकात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 10:33 PM2018-02-03T22:33:47+5:302018-02-03T22:34:09+5:30
आदिवासी विकास महामंडळाद्वारे अनेक योजना राबविल्या जातात; पण लक्ष्य कमी असल्याने गरजूंना लाभापासून वंचित राहावे लागते. आदिवासींकरिता असलेल्या शबरी आवास योजनेचे लक्ष्यांकही शासनाने यावर्षी अत्यल्प केले होते. परिणामी, लाभार्थ्यांना वंचित राहावे लागले असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आदिवासी विकास महामंडळाद्वारे अनेक योजना राबविल्या जातात; पण लक्ष्य कमी असल्याने गरजूंना लाभापासून वंचित राहावे लागते. आदिवासींकरिता असलेल्या शबरी आवास योजनेचे लक्ष्यांकही शासनाने यावर्षी अत्यल्प केले होते. परिणामी, लाभार्थ्यांना वंचित राहावे लागले असते. ही बाब लक्षात घेत पाठपुरावा केल्याने लक्ष्यांक दीड पट वाढविण्यात आले. पूर्वी १०० असलेले लक्ष्यांक आता २४५ झाले. यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत येणाºया सर्व योजनांचे उद्दीष्ट शासनाकडून वाढवून देण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्याला शबरी आवास योजनेचे २०१६-१७ मध्ये ३०२ एवढे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वर्धा जिल्हा परिषदेने ते पूर्ण करीत सर्व लाभार्थ्यांना आवास योजनेंतर्गत घर, निधीचे वाटप केले. यंदा तो लक्ष्यांक वाढवून मिळेल, अशी अपेक्षा असताना केवळ १०० आवास एवढे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामुळे अनेक लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावरून आ. समीर कुणावार, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी तथा जि.प. सदस्य शरद सहारे यांनी लक्ष्यांक वाढवून देण्याची मागणी केली. यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, प्रधान सचिव, मुख्य सचिव तथा सचिवांना निवेदन देण्यात आले होते. याची दखल घेत आदिवासी विकास मंत्रालयाकडून लक्ष्यांक वाढवून देण्यात आले आहे. आता जिल्ह्याला २४५ एवढे लक्ष्यांक देण्यात आले आहे. यामुळे लाभार्थ्यांना या योजनेत सामावून घेणे शक्य होणार आहे.
शबरी आवास योजना गरजू आदिवासी समाजातील लाभार्थ्यांना घरकूल उपलब्ध करून देण्यासाठी राबविली जात आहे. आदिवासी विकास महामंडळाकडून आदिवासी विकास प्रकल्प नागपूर यांच्या अंतर्गत या योजनेचे कार्यान्वयन केले जाते. गरजू लाभार्थ्यांची त्यांच्या पात्रतेनुसार निवड करून शबरी आवास योजनेचा लाभ दिला जातो. आता लक्ष्यांक वाढल्याने जिल्ह्यातील गरजू आदिवासी लाभार्थ्यांना घरकूल उपलब्ध होणे शक्य होणार आहे.
योजनेसाठीचे निकष व निधी
शबरी आवास योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा. लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असावा तथा त्याच्याकडे स्वत:ची जागा असावी, असे निकष देण्यात आलेले आहेत. हे निकष पूर्ण करणारे व्यक्ती शबरी आवास योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेतील घरकूलासाठी शासनाकडून प्रत्येकी १ लाख २० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो.
मागील वर्षी ३०२ चे लक्ष्यांक पूर्ण केले असता यावर्षीसाठी १०० एवढेच उद्दिष्ट देण्यात आले होते. याबाबत आ. समीर कुणावार, जि.प. सदस्य शरद सहारे व मी स्वत: आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना भेटून निवेदन दिले. लक्ष्यांक चारपट करण्याची मागणी केली. याची दखल घेत किमान दीडपट वाढ करून देत २४५ लक्ष्यांक देण्यात आले आहे.
- नितीन मडावी, अध्यक्ष, जिल्हा परिषद, वर्धा.