दैनंदिन जीवनात खादीचा वापर वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 11:34 PM2017-12-13T23:34:18+5:302017-12-13T23:34:49+5:30
खादी ही फॅशनच्या इतिहासात तशी जुनीच. आताच्या फॅशन जगात खादीही एव्हरग्रीन झाली आहे. खादी जुनी नसून ती प्रत्येकवेळेस नवेपणाची झालर घेऊन येते. खादी वापरल्यामुळे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खादी ही फॅशनच्या इतिहासात तशी जुनीच. आताच्या फॅशन जगात खादीही एव्हरग्रीन झाली आहे. खादी जुनी नसून ती प्रत्येकवेळेस नवेपणाची झालर घेऊन येते. खादी वापरल्यामुळे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो. त्यामुळे खादीला प्रोत्साहन देण्याकरिता खादीचा वापर दैनंदिन जीवनामध्ये जास्तीतजास्त करावा असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
महाखादी विक्री व प्रदर्शन तथा ग्रामोद्योग कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन कि बात या ३७ व्या कार्यक्रमामध्ये 'खादी फॉर ट्रांसफोर्मेशन' हा नारा देऊन खादीचा वापर करण्याकरिता लोकांना प्रोत्साहित केले होते. त्यांच्या आवाहनाला देशातील लोकांनी प्रतिसाद देत धनत्रयोदशीला १.२ कोटीची विक्री झाली होती. त्यामुळे खादीला प्रोत्साहन देण्याकरिता केंद्र सरकार कटिबद्ध आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खादीला आजच्या गरजेनुसार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आकर्षक केले जात आहे. त्यामुळे खादीला नवीन ओळख मिळाली, असे ते पुढे म्हणाले.
वर्धा हा गांधी जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. गांधीजींनी खादीला वेगळी ओळख मिळवून दिली. गांधीजी खादीचा वापर नियमित करीत. खादीला देशातच नव्हे तर संपूर्ण जगात मागणी आहे. खादीचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्यावतीने महाखादी यात्रा काढण्यात आली. मुंबई येथून राज्यपाल यांच्या हस्ते यात्रेस हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. ही महायात्रा वर्धा येथे पोहचली खा. रामदास तडस, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.
महाखादी विक्री व प्रदर्शन तथा ग्रामोद्योग, महाप्रात्यक्षिक सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात जिल्हा उपनिबंधक अजय कडू, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी लोणकर, उपजिल्हाधिकारी चौधरी, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, दानदेव व मंडळातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी खा. तडस यांनी सूतकताई केली. खादीचा प्रचार करून ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी सदर यात्रा काढण्यात आली आहे.