ईपीएस १९९५ योजनेंतर्गत सेवानिवृत्ती धारकांच्या वेतनात वाढ करा
By Admin | Published: September 14, 2016 12:38 AM2016-09-14T00:38:23+5:302016-09-14T00:38:23+5:30
महागाईच्या काळात असंघटीत कामगारांना शासनाकडून तुटपुंजे वेतन मिळत आहे. त्यांना मिळणारे सेवानिवृत्ती वेतनही अत्यल्प आहे.
रामदास तडस यांची लोकसभेत मागणी
पुलगाव : महागाईच्या काळात असंघटीत कामगारांना शासनाकडून तुटपुंजे वेतन मिळत आहे. त्यांना मिळणारे सेवानिवृत्ती वेतनही अत्यल्प आहे. त्यांचा सेवानिवृत्ती वेतनाचा प्रश्न सुटावा, यासाठी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या भगतसिंह कोशियारी समितीच्या शिफारशी केंद्र शासनाने स्वीकारून या कामगारांना दिलासा द्यावा, अशी मागणी खा. रामदास तडस यांनी लोकसभेत अतारांकित प्रश्नान्वये केली आहे.
आज सर्वच क्षेत्रातील शिक्षण महाग झाले आहे. लाखो रुपये खर्च करून शिक्षण घेतलेल्या अभियंता कामगार शिक्षक खासगी क्षेत्रात तुटपुंज्या वेतनावर वर्षांनुवर्षे काम करीत आहेत. अशा १८६ उद्योगातील लाखो असंघटीत कामगार सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. लाखो कामगार सेवानिवृत्तीनंतर अल्पशा निवृत्ती वेतना कुटुंबाचा गाडा रेटत आहे. या असंघटित कामगारांना व त्यांच्यावर निर्भर असणाऱ्या लाखो कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न शासनापुढे उभा आहे. या प्रश्नांतर्गत त्यांनी वर्तमान काळात कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस) ९५ अंतर्गत कामगार कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेल्या सेवा निवृत्ती राशीमध्ये वृद्धी करण्याचा विचार आहे का? असल्यास त्याबाबत माहिती व कारणे काय आहेत. याबाबत शासनाकडून अंतिम माहिती घेण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न खा. तडस यांनी लोकसभेत प्रधानमंत्री व केंद्रीय श्रम व रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ना. बंडारू दत्तात्रेय यांना केल्याची ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कोशियारी समितीच्या शिफारशी लागू करा
पुलगाव : अल्पवेतनावर काम करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उभा राहिल्यास त्याला किती सेवा निवृत्तीवेतन मिळेल. याचा विचार करणे गरजेचे असल्यामुळे आपण यापूर्वीही ८ डिसेंबर २०१४ रोजी नियम ३७७ अंतर्गत लोकसभेत प्रश्न उपस्थित करून भगतसिंह कोशियारी समितीच्या शिफारशी सेवानिवृत्ती धारकांना लागू करण्याची मागणी केली होती. असंघटित क्षेत्रातील सेवा निवृत्तीधारक कामगारांच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले.(तालुका प्रतिनिधी)