भुयारी गटार योजनेमुळे वाढली डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 10:05 PM2019-02-26T22:05:31+5:302019-02-26T22:06:12+5:30
शहरात मागील दोन-तीन महिन्यांपासून भुयारी गटार योजनेकरिता सुस्थितीतील रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून अपघाताची शक्यता बळावली आहे. या योजनेतील गैरप्रकाराची चौकशी करीत दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही आपने दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : शहरात मागील दोन-तीन महिन्यांपासून भुयारी गटार योजनेकरिता सुस्थितीतील रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून अपघाताची शक्यता बळावली आहे. या योजनेतील गैरप्रकाराची चौकशी करीत दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही आपने दिला आहे.
भुयारी गटार योजनेच्या कामाकरिता शहरातील असा एकही रस्ता व गल्लीबोळ शिल्लक नाही की, जी खोदलेली नाही. परिणामी, रहदारीला अडथळा निर्माण होत असून दररोज किरकोळ अपघात होत आहे. मात्र, याकडे लक्ष द्यायला संबंधित नगरसेवक, लोकप्रतिनिधींकडे वेळ नाही. यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. योजनेला अल्पावधीतच ग्रहण लागले असून बिडकर वॉर्डात पंधरवड्यापूर्वी बांधण्यात आलेले चेंबर फुटून मोठा खड्डा तयार झालेला आहे. त्यामुळे योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही आपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. चेंबर फुटून खड्डा तयार झाल्याने यात कुणी पडून अपघात झाल्यास सर्वस्वी जबाबदार कोण असेल, असा प्रश्नही ‘आप’ने केला आहे. शहरातील एकही रस्ता सुस्थितीत नाही. सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे. यामुळे नागरिकांनाच त्रास सहन करावा लागत असून बांधकामाची सखोल चौकशी करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी आपने निवेदनातून केली आहे.
या प्रकरणी कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. मुख्यधिकाºयांना निवेदन देताना प्रफुल्ल क्षीरसागर, भाऊराव कोटकर, जयंत लोहकरे, संदेश वासेकर, निसार, विनोद कुंभारे आदी उपस्थित होते.
हिंगणघाटातही योजना वादात
वर्ध्यातही नियोजनाच्या अभावात भुयारी गटार योजना राबविण्यात आली. नुकतेच बांधलेले सिमेंट रस्ते फोडण्यात आले. यामुळे विरोधी पक्ष, सामाजिक संघटनांनी प्रारंभीपासूनच विरोध दर्शविला. आता हिंगणघाटातही या योजनेवरून काहूर माजले आहे.
नियोजनाचा अभाव असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात ही भुयारी गटार योजना फसण्याचीच अधिक शक्यता नागरिकांतून वर्तविली जात आहे.मजबूत रस्ते या योजनेकरिता फोडल्यामुळे शासनाचे दुहेरी नुकसान होण्याची शक्यता आहे.
भुयारी गटार योजनेच्या कामाच्या चौकशीची मागणी
भुयारी गटार योजना सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जिल्ह्यातील ज्या-ज्या नगरपालिकेत ही योजना राबविली जात आहे. त्या ठिकाणी या योजनेची बोंबाबोंबच आहे. या योजनेचे काम करतांना कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोपही होत आहे. अल्पावधीतच या कामाला तडे गेल्याने कोट्यवधीच्या निधीचा चुराडा होत असल्याची ओरड होत आहे.पण, नगरपालिकेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने या कामाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.