वाढती श्रीमंती गरिबीला कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 11:43 PM2018-01-08T23:43:32+5:302018-01-08T23:44:24+5:30
आजच्या गरीबी रेखा जी खाली दिसते त्याला देशातील श्रीमंतांच्या चढत्या रेषा कारणीभूत आहे.
आॅनलाईन लोकमत
सेवाग्राम : आजच्या गरीबी रेखा जी खाली दिसते त्याला देशातील श्रीमंतांच्या चढत्या रेषा कारणीभूत आहे. त्यामुळे श्रीमंताची रेखा खाली आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राधाबहन भट यांनी केले.
येथील यात्री निवासच्या आचार्य दादा धर्माधिकारी सभागृहामध्ये गांधी १५० अभियानांतर्गत जानकीदेवी बजाज यांच्या १२५ व्या जयंती निमित्त व्याख्यानचे आयोजन केले होते. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, सामाजिक कार्यकर्ते विनायक ताकसांडे उपस्थित होते. राधाबहन पुढे म्हणाल्या, स्वातंत्र चळवळीत बजाज परिवार गांधीजींसोबत होता. चळवळीला गांधीजींनी आर्थिकतेची मागणी करताच जानकीदेवी आपले दागिने दिले. याला जमनालालजी यांचीही संमती होती. नंतर मात्र त्यांनी साधे जीवन कायम ठेवले. पांढरी साडी व हिरवी थैली यातच सदैव त्या दिसल्या. वास्तवात त्या राजस्थानी असताना सुद्धा अशा वेषात राहायला घाबरल्या नाहीत. भारतीय संस्कृतीत व्रताला फार महत्त्व आहे. संस्कारील जीवनाचा प्रभाव त्यांच्या मुला-मुलींवर पण झाला. कमलनयन यांचा विवाह खादीच्या कपड्यांवर व स्वत: घेतलेल्यांवर झाल्याचे भट यांनी सांगितले. त्यांचा विचार समजण्याची सध्या गरज आहे असेही त्या म्हणाल्या.
महादेव विद्रोही यांनी सांगितले की, आज देशात सोन्याला जास्त महत्त्व आले आहे. जे मंदिर श्रीमंत त्या ठिकाणी भक्तांची गर्दी जास्त; पण गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी मदत करताना महिलांनी दागिने दिले असे सांगितले. यावेळी राधाबहन भट, महादेव विद्रोही व विनायक ताकसांडे यांचा सूतमाळ व खादी शॉल देवून प्रा. डॉ. श्रीराम जाधव यांनी सत्कार केला. प्रास्ताविक व संचालन जयवंत मठकर यांनी केले तर आभार प्रशांत गुजर यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. गजानन कोठेवार, बाबा खैरकर, मोहन खैरकर, विजय धुमाळे, सचिन उगले, कुसुम पांडे यांच्यासह विविध महाविद्यालयातील विद्यार्थी हजर होते.