अवकाळीचे तांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:28 AM2018-04-16T00:28:28+5:302018-04-16T00:28:39+5:30
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवित रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास अचानक ढगांची गर्दी झाली. मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवित रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास अचानक ढगांची गर्दी झाली. मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. सुमारे १५ ते २० मिनीट चाललेल्या या पावसामुळे शेतकरी व सामान्यांचे मात्र मोठे नुकसान झाले. धोत्रा व तळेगाव (टा.) येथे वीज पडून सहा जनावरे दगावली. यात शेतकºयांचे २ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले.
दिवसभर उन्हाचा तडाखा असताना सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास अचानक ढगांची दाटी झाली. विद्युल्लतेचा कडकडाट आणि वादळी वाºयासह पावसाचे आगमन झाले. सायंकाळी वादळी वाºयासह आलेल्या या पावसाने मोठे नुकसान केले. शिवाजी चौक परिसरातील एक दुकान वादळी वारा व पावसामुळे कोसळले. यात दुकान मालकाचे प्रचंड नुकसान झाले. शिवाय शिवाजी चौक ते आर्वी नाका मार्गावर दोन झाडे कोसळली. यात संबंधितांचे नुकसान झाले. आर्वी नाका परिसरातही अजस्त्र वृक्ष कारवर उन्मळून पडले. यात संबंधित कार धारकाचे नुकसान झाले. शहरात वादळी वाºयामुळे अनेक फलक उडालेत, अनेकांच्या दुकानांतील साहित्य अन्यत्र उडून गेले. अचानक आलेला हा पाच ते दहा मिनीटांचा पाऊस मोठे नुकसान करून गेल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सेवाग्राम मार्गावरील अनेक झाडांच्या फांद्याही तुटल्याने नागरिकांचे नुकसान झाले.
यातच एकुर्ली येथील मारोती बारकू गिरडकर यांच्या धोत्रा (कासार) शिवारातील शेतात वीज कोसळली. यात शेतात बांधून असलेले दोन बैल, दोन गायी व एक वासरू ठार झाले. यात त्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने शेतकरी मारोती व त्यांचा मुलगा थोडक्यात बचावले असले तरी विजेची आस लागल्याने शेतकºयाचा पाय भाजला गेला. याच सुमारास वर्धा तालुक्यातीलच तळेगाव (टा.) येथे विठ्ठल मारोतराव तपासे यांच्या शेतातही वीज कोसळली. यात शेतात असलेला एक बैल ठार झाला. यामुळे शेतकरी तपासे यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. जिल्ह्यात अन्यत्र ाीज पडल्याच्या घटनांची नोंद नाही. नारायणपूर शिवारात वादळी वारा व पावसामुळे रस्त्यालगतची मोठी झाडे उन्मळून पडली. शिवाय जिल्ह्यात देवळी, वर्धा, सेलू, समुद्रपूर व हिंगणघात तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. इंझाळा, नाचणगाव शिवारात जोरदार पाऊस झाल्याने अनेक घरांचे नुकसान झाले. अनेकांच्या घरांवरील टीनाही उडून गेल्याचे वृत्त आहे.
विद्युत पुरवठा खंडित
वादळी वाºयासह जिल्ह्यात आलेल्या पावसामुळे अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वर्धा शहरात तब्बल एक ते दीड तास विद्युत पुरवठा खंडित होता. शिवाय वडनेर, नारायणपूर, इंझाळा यासह अनेक ठिकाणी पावसाचे आगमन होताच वीज पुरवठा खंडित झाला होता. पाऊस थांबल्यानंतर वर्धा शहरासह काही ठिकाणचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला तर ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले नाही.