स्वातंत्र्य दिनी आंदोलनांचा हुंकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:43 AM2017-08-17T00:43:17+5:302017-08-17T00:43:47+5:30
हिंगणघाट बाजार समितीने अन्याय केल्याचा आरोप करीत आनंद साटोणे याने स्वातंत्र्य दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : हिंगणघाट बाजार समितीने अन्याय केल्याचा आरोप करीत आनंद साटोणे याने स्वातंत्र्य दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. यामुळे पोलीस यंत्रणेची भंबेरी उडाली होती. त्यानेच स्वातंत्र्य दिनी विरूगिरी केली. शहर पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. यामुळे आत्मदहन नाट्यावर पडदा पडला. काही तास ठेवून त्याची सुटका करण्यात आली.
आनंद साटोणे याने ८ आॅगस्ट रोजी घराबाहेर पडताना एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात त्याने आपल्यावर हिंगणघाट कृउबासचे सभापती, सचिव सर्व संचालक व जिल्हा उपनिबंधकांनी अन्याय केल्याचा आरोप केला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी वेळोवेळी निवेदने दिली; पण कार्यवाही झाली नाही. यामुळे १५ आॅगस्टला कुठेही आत्मदहन करणार, असे चिठ्ठीत नमूद केले. याबाबत त्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी ९ आॅगस्ट रोजी तो बेपत्ता असल्याची नोंद घेतली. त्याने स्वातंत्र्य दिनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर चढून विरूगिरी केली. माहिती मिळताच शहर पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून शिताफीने त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल केला नसल्याचे सांगितले.
अंगणवाडीला ठोकले कुलूप
नाचणगाव - घोडेगाव येथील अंगणवाडी क्र. २० मध्ये दोन ते अडीच वर्षांपासून अंगणवाडी सेविका नाही. याबाबत ग्रा.पं. कार्यालय, गटविकास अधिकारी देवळी, एकात्मिक बालविकास अधिकाºयांना निवेदनही दिले; पण त्याचा परिणाम झाला नाही. ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव घेत तो शासनाला सादरही केला; पण उपाययोजना होत नसल्याने स्वातंत्र्य दिनी ग्रामस्थांनी अंगणवाडीला कुलूप ठोकले. अंगणवाडी सेविका उपलब्ध होईपर्यंत कुलूप उघडणार नसल्याचा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात आला. याबाबत माहिती मिळताच प्रभारी बालविकास अधिकारी राजश्री सावळे यांनी बुधवारी अंगणवाडीला भेट दिली. यावेळी ग्रामस्थांशी चर्चा केली; पण पालक व ग्रामस्थ निर्णयावर ठाम होते.
पोस्टमास्टर व पोस्टमन संपावर
वर्धा - डाक सेवकांचे केंद्रीय सचिव महादेवय्या यांनी जाहीर केल्याप्रमाणे सातवा वेतन आयोग शासनाने लागू केला नाही. यामुळे बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहणार आहे. ग्रामीण भागातील सर्व पोस्टमास्टर व पोस्टमन या संपात सहभागी आहेत.