मनुष्य निर्मितीनंतरच भारताची निर्मिती होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:42 PM2018-01-20T23:42:36+5:302018-01-20T23:42:50+5:30
चारित्र्यवान मनुष्याची निर्मिती झाली तरच बलशाली भारताचे निर्माण शक्य आहे. त्यासाठीच स्व. भा.ल. भीमनवार यांच्या कार्याकडे आपणास पाहावे लागेल, असे मत वणी येथील नियोजित विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक डॉ. शिरीष गोपाळराव देशपांडे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : चारित्र्यवान मनुष्याची निर्मिती झाली तरच बलशाली भारताचे निर्माण शक्य आहे. त्यासाठीच स्व. भा.ल. भीमनवार यांच्या कार्याकडे आपणास पाहावे लागेल, असे मत वणी येथील नियोजित विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक डॉ. शिरीष गोपाळराव देशपांडे यांनी व्यक्त केले.
भारत विद्यालयात स्व. भास्करराव भीमनवार यांच्या स्मृत्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. डॉ देशपांडे पूढे म्हणाले की, या देशात खुलेआम भारत तेरे तुकडे होंगे, असे म्हणणारी एक विचारधारा आहे. दुसरीकडे या देशातील मातीवर अफाट प्रेम करणारी विचारधारा आहे. यापैकी कोणती विचारधारा आपण निवडायची, हे आधी ठरवा. या मातीवर प्रेम करता आले पाहिजे; पण त्यासाठी केवळ चांगले असून भागत नाही तर त्या चांगुलपणाचे रक्षण करता आले पाहिजे. त्यासाठी जाती-पातीचे राजकारण नाकारले पाहिजे. आम्ही जात पाळत असू तर आम्ही जनावरांपेक्षाही चुकीचे वागत आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. शिवाजी राजांनी मदारीसारखा राष्ट्रवादी मुस्लिम जवळ केला तर त्याच वेळी या देशाविरूद्ध लढणारा जयसिंग दूर लोटला, हा इतिहास आपल्यापूढे आहे. म्हणूनच मातीवर प्रेम करीत असतानाच भारत तेरे तुकडे होंगे म्हणणाºयांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.
व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी प्रदीप भीमनवार होते. प्रास्ताविक वसंत आंबटकर यांनी केले. परिचय रमेश धारकर यांनी करून दिला. समरसता मंचाचे जिल्हा कार्यवाह बी.जी. खैरकार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संचालन दत्ता भांगे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका कल्पना मोरे यांनी मानले.
कार्यक्रमाला जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, न.प.अध्यक्ष प्रेम बसंतानी, पं.स. सभापती गंगाधर कोल्हे, रेखा भीमनवार, वर्धा नागरी बँकेचे संचालक रमेश टपाले, संस्थेचे उपाध्यक्ष श्याम भीमनवार, संचालक विजय अग्रवाल, संजय देशपांडे, हरिहर लोंढेकर, वामनराव खोडे, संजय मेमोरीयलच्या सचिव वैशाली वणीकर, अॅड. साहित्यलक्ष्मी देशपांडे, शहरातील मान्यवर उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.