भारतीय चिकित्सा प्रणालीचा सन्मान व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:40 PM2018-01-20T23:40:25+5:302018-01-20T23:40:37+5:30
आयुर्वेद केवळ चिकित्सा-प्रणाली नाही तर ती एक जीवनशैली आहे. भारतीय संस्कृतीची अविभाज्य अंग असलेली ही चिकित्साप्रणाली कित्येक शतकांपासून घरोघरी वापरली जाते. केवळ निरामय आरोग्यच नव्हे तर प्रत्येकाला रोजगार देण्याचे सामर्थ्य आयुर्वेदात आहे; ......
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आयुर्वेद केवळ चिकित्सा-प्रणाली नाही तर ती एक जीवनशैली आहे. भारतीय संस्कृतीची अविभाज्य अंग असलेली ही चिकित्साप्रणाली कित्येक शतकांपासून घरोघरी वापरली जाते. केवळ निरामय आरोग्यच नव्हे तर प्रत्येकाला रोजगार देण्याचे सामर्थ्य आयुर्वेदात आहे; पण मूळ भारतीय असूनही ही चिकित्साप्रणाली दुर्लक्षित राहिली. आयुर्वेदाचा जगभरात व्यापक प्रचार, प्रसार करून या चिकित्सा-प्रणालीचा सन्मान केला जावा, असे आवाहन कुलपती दत्ता मेघे यांनी आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या सभागृहात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केले.
म.गांधी आयुर्वेद महाविद्यालय व अनुसंधान केंद्राद्वारे सावंगी (मेघे) येथे ‘आयुर्वेद फॉर ग्लोबल वेल बिइंग’ या विषयावर आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कुलपती दत्ता मेघे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. राजीव बोरले तर मंचावर भारतीय चिकित्सा परिषदेचे राज्याध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, माजी केंद्रीय उपाध्यक्ष डॉ. अमिताभकुमार पांडे, द.मे. आयुर्विज्ञान संस्थेचे मुख्य समन्वयक डॉ. एस.एस. पटेल, माजी प्र-कुलगुरू डॉ. व्ही.के. देशपांडे, विशेष कार्य अधिकारी अभ्यूदय मेघे, म.गां. आयुर्वेद महा.चे अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा, डॉ. प्रीती देसाई, डॉ. केएसआर प्रसाद, व्ही.आर. मेघे, डॉ. अभय मुडे, डॉ. अशोक पखान, डॉ. अझरूद्दीन काझी, प्राचार्य बी.डी. कुळकर्णी, प्राचार्य इंदु अलवटकर, डॉ. ललीत वाघमारे, डॉ. मुकूंद दिवे, मनीष देशमुख उपस्थित होते. आयुर्वेद चिकित्सकांना मिश्र चिकित्सापद्धतीचा वापर करण्याचा हक्क अबाधित रहावा, यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार आहोत, असे डॉ. आशुतोष गुप्ता म्हणाले. मेघे विद्यापीठांतर्गत कार्यरत आयुर्वेद महा. व रुग्णालय हे आयुर्वेदोपचाराचे ‘रोल मॉडेल’ आहे, असेही ते म्हणाले. म. गांधी आयुर्वेद महा.तील उपक्रमांची भारतीय चिकित्सा परिषदेने नेहमी दखल घेतली असून येथील अनेक बाबी अनुकरणीय राहिल्या, असा विश्वास डॉ. पांडे यांनी व्यक्त केला. आयुर्वेद महा.च्या दशकपूर्ती विशेषांकाचे प्रकाशन दत्ता मेघे यांच्या हस्ते केले गेले. डॉ. गौरव सावरकर निर्मित ‘मर्मअॅप’चे उद्घाटन डॉ. पांडे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. भुतडा यांनी केले. परिषदेची भूमिका डॉ. देसाई यांनी मांडली. संचालन डॉ. नम्रता व डॉ. चौरागडे यांनी केले. धन्वंतरी स्तवन मानसी चुंचुवार हिने गायले तर आभार मनीष देशमुख यांनी मानले.
आयुर्वेद वनस्पतींचे संवर्धन गरजेचे - डॉ. निश्तेश्वर
पुरातन भारतीय चिकित्सा पद्धतीला चालना देण्यासाठी आयुर्वेदप्रेमींनी एकत्र येऊन ही उपचार पद्धती अधिक प्रभावी कशी होईल यादृष्टीने चिंतन, संशोधन केले पाहिजे. येत्या पिढ्यांसाठी आयुर्वेद चिकित्साप्रणाली हा मोठा आरोग्य ठेवा असून हे ज्ञान नामशेष होऊ नये म्हणून औषधी वनस्पतींचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असे मत प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. के. निश्तेश्वर यांनी व्यक्त केले.