इंदिरानगर झोपडपट्टीतील चिमुकले विद्यादानाने ‘मोहित’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 05:09 AM2018-09-24T05:09:28+5:302018-09-24T05:09:42+5:30
चला गुरुजी आले...गुरुजी मला ड्राईंगची वही द्या... गुरुजी मला पेन्सिल द्या...गुरुजी माझा उद्या पेपर असल्यानं मला हेच शिकवा...असे बोबडे बोल समाजापासून कायम उपेक्षित असलेल्या वर्ध्याच्या इंदिरानगर झोपडपट्टीत दररोज सायंकाळी ऐकायला मिळतो.
- आनंद इंगोले
वर्धा : चला गुरुजी आले...गुरुजी मला ड्राईंगची वही द्या... गुरुजी मला पेन्सिल द्या...गुरुजी माझा उद्या पेपर असल्यानं मला हेच शिकवा...असे बोबडे बोल समाजापासून कायम उपेक्षित असलेल्या वर्ध्याच्या इंदिरानगर झोपडपट्टीत दररोज सायंकाळी ऐकायला मिळतो. झोपडपट्टीतील वंगाळपणा पाहून अनेक जण तिरकस नजरेनं बघत नाक मुरडून निघून जातात. पण, याच झोपडपट्टीतील चिमुकल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून; त्यांच भविष्य उज्ज्वल करण्यासाठी धडपडणाऱ्या युवकाच्या विद्यादानाने येथील चिमुकले सद्या ‘मोहित’ झाले आहे.
आर्वी नाका परिसरातील इंदिरानगर झोपडपट्टीत वडार समाजबांधवांची वसाहत आहे. या वस्तीतील अनेक जण शिक्षणाच्या गावी गेलेच नसल्याने शिक्षणाचा मार्गही त्यांनी कधी शोधला नाही. त्यामुळे मुलंही दिवसभर बाहेर खेळतात. शाळेत गेले काय किंवा नाही गेले काय, कुणाला सोयरसूतक नाही. यास अपवाद फक्त एखादाच पालक असू शकतो. येथील हे शाळा सोडून दिवसभर रस्त्यानं हिंडणारे, खेळणारे चिमुकले मोहित सहारे या युवकाच्या नजरेस पडले. सर्वसामान्य कुटुंबातील मोहित हे चित्र पाहून थक्क झाला. अज्ञान हा माणसाचा शत्रू आहे, हे ओळखून या चिमुकल्यांची या शत्रुपासून मुक्ती करण्याची खुणगाठ मोहितने मनाशी बांधली. त्यानंतर त्याने या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भवितव्याकरिता झोपडपट्टीतच फुटपाथ स्कूल सुरु केली.
स्वत: पॉलीटेक्निक अग्रीकलचरचा विद्यार्थी असलेला मोहित आता गुरुजी बनलाय. चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य देताना बरेचदा मोहितला पदरमोडही करावा लागतो. एकीकडं सरकार अंतराची अट टाकून शाळा बंद करतय तर दुसरीकडं अनेकांनी खासगी शाळांची दुकानदारी उघडली. अनेक सरकारी शाळांत गलेलठ्ठ पगार घेऊनही चिमुकल्याची प्रगती जेमतेम आहे. अशातच झोपडपट्टीत ज्ञानाचा दिवा लावण्याचा मोहीतचा हा प्रयत्न इतरांना पे्ररणा देणारा ठरत आहे.
शून्यापासून सुरू झाला प्रवास
सुरूवातीला मोहितच्या या फुटपाथ स्कूलमध्ये कुणी विद्यार्थी येत नव्हते. परंतू त्याने आपले प्रयत्न कायम ठेवले. सुरुवातीला पंधरवड्यातून एक दिवस, नंतर आवड्यातून एक दिवस, त्यानंतर चार दिवसातून एक दिवस तर आता शाळेचेही दिवस आणि वेळ वाढू लागल्याने रोजचीच शाळा सुरु झाली. आता मोहित गुरुजी दिसताच चिमुकले पटापट घरून दप्तर घेऊन येतात. झोपडपट्टीतील एका बोळीत चटई टाकून शाळा सुरू होते. दररोज जवळपास ५० चिमुकले दोन ते तीन तास शाळेतील अभ्यासासोबतच पुस्तकातील अभ्यास करतात. हे चित्र पाहून पालकांनाही आनंद होत आहे. तेही आपल्या चिमुकल्याबद्दल आस्थेने विचारपूस करायला लागले आहे.
पूर्वी हे चिमुकले अभ्यासापासून दूरच राहायचे. शाळेतून आल्यानंतर अभ्यास केलाच पाहिजे, ही गरजच वाटत नव्हती. पण, आता या चिमुकल्यांना अभ्यासाची सवय लावली. पालकही चिमुकल्यांना या शाळेत पाठवू लागले. ही शाळा सुरू झाल्यानंतर चिमुकल्यांना अक्षरओळख झाली. गणितही येऊ लागले. चिमुकल्यांमध्ये यातून सुधारणाही दिसू लागली. उपेक्षित असलेल्या या समाजामध्ये हा बदल होतांना पाहून मनस्वी आनंद होत आहे.
-मोहित सहारे, फुटपाथ शाळेचे गुरुजी.