देवळी औद्योगिक वसाहतीतील १०८ पैकी ६४ भूखंडातील उद्योग पडले ओस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 05:51 PM2023-08-07T17:51:56+5:302023-08-07T17:53:21+5:30
कष्टकऱ्यांना केवळ दोन मोठ्या उद्योगांचा आधार
हरिदास ढोक
देवळी (वर्धा) : नागपूर-यवतमाळ मार्गावरील मध्यम औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या देवळी येथील औद्योगिक वसाहतीला केवळ दोन मोठ्या उद्योगांचा आधार राहिला आहे. तेथील एसएमडब्लू इस्पात हा लोखंडाचा कारखाना तसेच याच कारखान्याचा एक भाग असलेला पॉवर प्लांट कष्टकऱ्यांना आधार देणारा ठरत आहे. विशेष म्हणजे या औद्योगिक वसाहतीत १०८ भूखंड आहेत; पण उत्पादनाअभावी तब्बल ६४ भूखंडांवरील उद्योग ओस पडले आहेत.
देवळी येथील औद्योगिक वसाहतीतील एसएमडब्लू इस्पात कारखान्यासह पॉवर प्लांटची जनसुनावणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयोजित केली आहे. शिवाय वसाहतीत टॉवरचे उत्पादन करण्यासाठी ट्रान्सरेल उद्योग कार्यरत आहे. या प्रकल्पामुळे काही प्रमाणात रोजगाराची संधी प्राप्त होत आहे. या प्रकल्पाद्वारे टॉवरचे सुटे पार्ट बोलवून उद्योगाला चालना दिली जात आहे. या व्यतिरिक्त देवळीच्या वसाहतीत लघु उद्योग ६७, मध्यम उद्योग ११ तसेच मोठे उद्योग ७ आहेत. त्यातील बरेच उद्योग नाममात्र ठरले आहे.
औद्योगिक वसाहतीतील १०८ पैकी ६४ भूखंडातील उद्योग ओस पडले आहे. शिवाय शंभर ते सव्वाशे एकर परिसरात उभा राहिलेला केंद्र शासनाचा पॉवर ग्रीड प्रकल्प विकासाचा पांढरा हत्ती ठरत आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा तसेच ऑटोमॅटिक असलेल्या या प्रकल्पाची ओळख फक्त विद्युत थांबा म्हणून राहिली आहे. प्रकल्पांतर्गत इतर राज्यातून येणाऱ्या विद्युतचे स्टोरेज करण्यात येत असल्याने हा प्रकल्प रोजगाराच्या दृष्टीने कुचकामी ठरला आहे.
औद्योगिक वसाहतीचा परिसर ७५० एकर
देवळी येथील औद्योगिक वसाहत नागपूर-यवतमाळ मार्गावर असून हा परिसर ७५० एकरचा आहे. त्याला शासन स्तरावर डी/१ (ग्रोथ सेंटरचा) चा दर्जा प्राप्त आहे. राज्याच्या तत्कालीन महसूल मंत्री दिवंगत प्रभा राव यांच्या प्रयत्नातून ही वसाहत उभी राहिली. शिवाय सन १९९४ ला या वसाहतीची पायाभरणी करण्यात आली. राज्याचे तत्कालीन उद्योग मंत्री दिवंगत जवाहरलाल दर्डा यांच्या हस्ते तसेच प्रभा राव यांच्या प्रमुख उपस्थितीत पायाभरणीचा सोहळा पार पडला होता.
२० भूखंडांवर बांधकाम
वसाहतीत १०८ भूखंड असून यांपैकी १०४ भूखंडाचे उद्योजकांना वाटप करण्यात आले. शिवाय यापैकी फक्त ४४ भूखंड उत्पादनात असून यात लहान-मोठे उद्योग सुरू आहे. तसेच २० भूखंडात उद्योगाचे बांधकाम सुरू आहे. तसेच उर्वरित भूखंड ओस पडले आहे. या वसाहतीत एसएमडब्ल्यू इस्पात (स्टील उद्योग) नावाचा एकमेव मोठा उद्योग कार्यरत असल्याने देवळीतील दैनंदिन व्यवहाराला चालना मिळाली आहे. शिवाय सुशिक्षित बेकार व मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. येत्या काही दिवसात या उद्योगाचे विस्तारीकरण होत आहे. विस्तारित उद्योगात २ हजार टन प्रतिदिवस आर्यन ओर पेलेट प्लांट, १ हजार टन प्रति दिवस कोल गॅसिफायर स्पॉंज आर्यन प्लांट तसेच स्वतःच्या मालकीच्या पॉवर प्लांटचा समावेश करण्यात आला आहे.
होतकरू भूमिपुत्र बेरोजगारच
कारखान्याच्या विस्तारीकरणामुळे परिसरात होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जनसुनावणीत ही बाब चर्चेत येणार आहे. त्यामुळे संबंधित कारखानदारांनी प्रदूषण टाळण्यासाठी उच्च प्रतीची तांत्रिक यंत्रणा राबवावी, अशी मागणी होत आहे. देवळीतील भूमिपुत्रांनी जीवापाड जोपासलेली शेतजमीन या प्रकल्पासाठी कवडीमोल भावाने दिली. त्यामुळे यातील अनेक शेतकरी भूमिहीन झाले. भूमिहीन कुटुंबातील एकाला नोकरीत सामावून घेण्याची बाब शासनाने आजपर्यंत दुर्लक्षित केली आहे. त्यामुळे मागील २९ वर्षांत या कुटुंबातील युवक नोकरीपासून वंचित आहे. भूमिपुत्रांना केंद्र किंवा राज्य शासनाने सकारात्मक विचार करून नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी आहे.