नागझरीसह बेलगाव शिवारात ‘हुमनी’ अळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 11:30 PM2018-08-11T23:30:58+5:302018-08-11T23:33:33+5:30
तालुक्यातील नागझरी व बेलगाव शेत शिवारातील सोयाबीन व तूर पिकांवर सध्या हुमनी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने तेथील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. काही शेतकऱ्यांकडून त्यांच्या शेतातील सोयाबीन व तूर पीक मुळासह उलथावून लावले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : तालुक्यातील नागझरी व बेलगाव शेत शिवारातील सोयाबीन व तूर पिकांवर सध्या हुमनी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने तेथील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. काही शेतकऱ्यांकडून त्यांच्या शेतातील सोयाबीन व तूर पीक मुळासह उलथावून लावले जात आहे. सदर बाब काही शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक अस्मिता मेसरे व प्रियंका आडे यांना सांगितली असता त्यांनी परिसरातील पिकांची पाहणी करून अहवाल तयार करीत तो वरिष्ठांना सादर केला आहे.
तालुक्यातील मौजा नागझरी व बेलगाव येथे हुमनी नावाच्या अळीचा सोयाबीन व तूर पिकांवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही अळी संपूर्ण झाड उलथावून लावत आहे. आधीच कमी पावसामुळे सोयाबीन पीक संकटात आहे. त्यातच हे संकट शेतकऱ्यांसमोर असल्याने उत्पादनात घट येण्याची भीती वर्तविली जात आहे. कृषी विभागाने याकडे लक्ष देत सोयाबीन व तूर उत्पादक शेतकºयांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.परिसरातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता जि.प.चे माजी सदस्य मोहन शिदोडकर व काही शेतकºयांनी याबाबतची माहिती मंडळ कृषी अधिकारी जवळे यांना दुरध्वनीवरुन दिली; त्यावर त्यांनी आपण संपात सहभागी असल्याचे कारण सांगून आपली जबाबदारीच झटकल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. कृषी सहाय्यक मेसरे व आडे यांनी पाहणी केलेल्या शेतात मिनाक्षी शिदोडकर, मोहन राऊत, मंगेश मस्के, गजानन चौधरी, वसंत जगताप, मनोज शेंदरे, ज्ञानेश्वर पाटील, सुनील भागवत, मनोहर भगत व पंकज जीवने आदी शेतकºयांचा समावेश आहे.
अळीचे अस्तित्त्व कडूनिंब, बाभुळ व बोरीच्या झाडावर
सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. उंंबरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुमनी अळीचे अस्तित्व कडू निंब, बाभुळ व बोर जातीच्या झाडावर असते. या अळीचे भुंगे जमिनीवर येवून अंडी घालतात. याप्रकारे अंडीतून निघालेल्या अळीचा कुजलेल्या शेणखताचे माध्यमातून शेतापर्यंत प्रवास असतो. या अळीचा वेळीच नायनाट न केल्यास संपूर्ण पीक धोक्यात येण्याची भीती असते.
अळीचा प्रादुर्भाव असलेल्या या भागात कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी व तालुका कृषी कार्यालयाचा पाहणी दौरा आयोजित केला आहे. हुमनी अळीचा प्रकोप असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संबंधित शेतांचे पंचनामे व उपाय-योजना केली जात आहे.
- एस. आर. हाडके, तालुका कृषी अधिकारी, देवळी.