पिकांवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:25 AM2018-08-01T00:25:53+5:302018-08-01T00:26:59+5:30
गत काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. सदर परिस्थितीमुळे सध्यास्थितीत सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांवर काही प्रमाणात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. सदर परिस्थितीमुळे सध्यास्थितीत सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांवर काही प्रमाणात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. सध्याची ढगाळी वातावरणाची परिस्थिती आणखी आठवडाभर कायम राहिल्यास विविध पिकांवर सदर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे शेतकºयांच्या अडचणीत भर पडली असून शेतकºयांना कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. शिवाय तशी मागणीही आहे.
सध्याचे ढगाळी वातावरण पिकांवरील सदर किडींच्या प्रादुर्भावाला पोषक ठरत आहे. जिल्ह्यातील काही भागातील पिकांवर सध्या पांढरी माशी, तुडतुडे, चक्रभुंगा, मावा आदी किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदाही उत्पादनात घट होईल अशी भीती शेतकºयांकडून वर्तविली जात आहे. सोयाबीन पिकावर चक्रभुंगा तर कपाशी पिकावर काही परिसरात तुडतुड्यांचा प्रादुर्भाव असल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. शेतकºयांनी संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपाय-योजना करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकºयांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटकाच सहन करावा लागत आहे.
मादी घालते सुमारे २०० अंडी
जिल्ह्यातील काही भागातील कपाशी पिकांवर सध्या तुडतुडांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सदर किटकजन्य प्रजातीतील मादी ही सुमारे २०० अंडी घालते. ढगाळी वातावरण त्यांच्यासाठी पोषक ठरत असल्याने त्या अंडीतून मोठ्या प्रमाणात किटकही बाहेर पडतात. त्यामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत असून कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील विविध पिकांवर सध्या चक्रभुंगा, मावा, तुडतुडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकºयांनी त्याला घाबरून न जाता सदर प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोनोप्रोटोफॉसची फवारणी टाळत निंबोळी अर्काची फवारणी करावी. तसेच कृषी विभागाच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपाययोजना करावी.
- डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.
पुढेही ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता
सध्यास्थितीत भारतावरून मान्सून वारे वाहत आहेत. त्यामुळे वर्धा जिल्ह्यासह देशातील विविध भागात ढगाळी वातावरण आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. शिवाय पुढील आठवड्यात पाऊस येण्याचीही शक्यता असल्याचे हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. शेतकºयांसह सर्वसामान्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षाच आहे.