वर्धा जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 12:42 PM2020-07-17T12:42:08+5:302020-07-17T12:42:29+5:30
ग्रीन झोनमध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला असून आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५८ वर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सुरुवातील ५० दिवस ग्रीन झोनमध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला असून आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५८ वर पोहचली आहे. सेवाग्राम येथील रुग्णालयात मधुमेहाने उपचारासाठी दाखल असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. तिचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिला महादेवपुरा वर्धा येथील राहणारी होती. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यापैकी २९ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. कारंजा तालुक्यात आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता.
गुरुवारी कारंजा तालुक्यातील काकडा येथे पती-पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. गुरुवारी जिल्ह्यात ८ रुग्ण आढळून आले. यामध्ये ३ महिला व ४ पुरुषांचा समावेश आहे. यात आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयातील दोन आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात एक परिचारिका व वॉर्ड बॉयचा समावेश आहे. तर वर्धा शहरातील हिंदनगर, इतवारा, केशवसिटी या भागातही कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले आहेत.