जलयुक्त शिवारच्या पूर्ण कामांवर माहिती फलक
By admin | Published: September 6, 2015 02:07 AM2015-09-06T02:07:08+5:302015-09-06T02:07:08+5:30
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील २१४ गावांमध्ये विविध यंत्रणा तसेच लोकसहभागातून तयार झालेल्या कामांतून शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ घेणे शक्य झाले.
आशुतोष सलील यांच्या सूचना : तपशिलासह छायाचित्राचा अहवाल होणार तयार
वर्धा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील २१४ गावांमध्ये विविध यंत्रणा तसेच लोकसहभागातून तयार झालेल्या कामांतून शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ घेणे शक्य झाले. जिल्ह्यात पूर्ण झालेल्या कामांची संपूर्ण माहिती फलकावर प्रदर्शित करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी शनिवारी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार कामांचा आढावा आशुतोष सलील यांनी घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा समितीचे सहअध्यक्ष मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना, अतिरक्त मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, समितीचे तज्ज्ञ सदस्य एम.टी. सोमनाथे, सदस्य सचिव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, भाऊसाहेब बऱ्हाटे, उपजिल्हाधिकारी दीपक नलावडे तसेच विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियांतर्गत २१४ गावांमध्ये १,५०८ कामे पूर्ण झाली असून ३३८ कामे प्रगतिपथावर आहेत. यासाठी जिल्हा नियोजन मंडळ तसेच विविध यंत्रणांमार्फत ३७ कोटी ७७ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. जलयुक्त शिवार अभियानामध्ये पूर्ण झालेल्या कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी झाल्यानंतरच कामांचे अंतिम देयक देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. प्रत्येक कामांचे छायाचित्र तसेच काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या प्रतिक्रियाही घेण्यात याव्यात. अभियानांतर्गत जिल्हा समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांसंदर्भात अपूर्ण राहिलेली कामे व अद्याप सुरू न झालेल्या कामांचा आढावा घेऊन ही कामे पूर्ण करण्यासंदर्भात यंत्रणांनी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.